IPL 2024, Royal Challengers Bennglore vs Sunrisers Hyderabad: आयपीएल २०२४ मध्ये आरसीबीला एकामागून एक पराभवांचा सामना करावा लागत आहे. हैदराबादविरूद्धच्या विक्रमी सामन्यातील आरसीबीचा पराभव हा या मोसमातील त्यांचा सलग पाचवा पराभव होता. ७ पैकी ६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याने आता बेंगळुरूचा प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा रस्ता कठीण झाला आहे. विराट कोहली, दिनेश कार्तिक आणि फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल असे एकापेक्षा एक दमदार खेळाडू असूनही आरसीबीच्या नशीबात या मोसमातही निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागत आहे. आरसीबी संघाची अशी कामगिरी पाहून केवळ चाहतेच नाही तर अनेक माजी दिग्गजांनाही आश्चर्य वाटत आहे. अनुभवी टेनिसपटू महेश भूपतीनेही पोस्ट शेअर करून आरसीबीला विकून मोकळे व्हा असे म्हटले आहे.
– quiz
महेश भूपतीने एक्सवर पोस्ट शेअर करत बीसीसीआयला विशेष आवाहनही केले आहे. भूपतीने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहतेही त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. भूपतीने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “खेळ, आयपीएल, चाहते आणि अगदी खेळाडूंच्या भल्यासाठी आता आरसीबीकरता नवीन मालक शोधणे बीसीसीआयच्या हिताचे आहे, जो इतर संघांप्रमाणे या फ्रँचायझीला अधिक चांगले बनवण्यासाठी काम करेल.”
आरसीबीच्या सर्वात खराब गोलंदाजीमुळे हैदराबादने आरसीबीविरूद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २८७ धावा केल्या. याच मोसमात सनरायझर्सने २७ मार्चला मुंबई इंडियन्सविरुद्ध तीन विकेट्सवर २७७ धावा करून नवा विक्रम रचला होता आणि आज हैदराबादनेच स्वत:चा विक्रम मोडला.
ट्रॅव्हिस हेडचे आक्रमक शतक आणि कर्णधार पॅट कमिन्सच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा २५ धावांनी पराभव केला. हेडच्या पहिल्या टी-२० शतकाशिवाय, हेनरिक क्लासेनने झटपट ६७ धावा केल्या. आरसीबीच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई या सामन्यात पाहायला मिळाली. सर्वच जण आरसीबीची गोलंदाजी पाहून चकित झाले होते. इतर सर्व आयपीएल संघांच्या तुलनेत यंदाच्या मोसमात आरसीबीची गोलंदाजी फारच साधारण राहिली आहे.
प्रत्युत्तरात, आरसीबीच्या फलंदाजांनीही शानदार फलंदाजी करत सात बाद २६२ धावा केल्या. कमिन्सने या खेळपट्टीवर ४३ धावांत तीन विकेट घेतले. या आयपीएल सामन्यात ४० षटकांत ५४९ धावांचा पाऊस पडला, जो एक टी-२० मधील सर्वाच्च धावसंख्येचा विक्रम आहे.