IPL 2024, Mumbai Indians vs Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रियान पराग यंदाच्या आयपीएल हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यात १८१ वा केल्या असून त्याने ऑरेंज कॅप मिळवली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करत ५४ धावांची नाबाद खेळी करत राजस्थान रॉयल्सला हंगामातील सलग तिसरा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर जेव्हा तो त्याच्या टीम हॉटेलमध्ये गेला, तिथे रियानची आई त्याची वाट पाहत होती. रियान जेव्हा आईला भेटला तेव्हाचा क्षण पाहण्यासारखा होता. राजस्थान रॉयल्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सामना संपल्यानंतर रियान पराग टीम हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा त्याची आई तिथे उपस्थित होती. आईला पाहताच रियानच्या चेहऱ्यावरही आनंद दिसला. आपल्या मुलाला पाहताच रियानच्या आईने त्याला जवळ घेतलं. आई लहान बाळाला जशी कुरवाळते आणि त्याचे लाड करते, तसाच तो क्षण होता. यानंतर त्याच्या आईने रियान परागच्या बॅगमधून क्याला मिळालेली ऑरेंज कॅप काढली आणि स्वतच्या हाताने त्याला घातली. रियान परागचा हा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राजस्थानचा हा युवा फलंदाज आयपीएल २०२४च्या सुरुवातीपासूनच शानदार फॉर्मात आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध संघाच्या सलामीच्या सामन्यात त्याने ४३ धावांची इनिंग खेळली होती. यानंतर, त्याने विस्फोटक फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ८४ धावांची नाबाद खेळी केली. या सामन्यात सुरूवातीला राजस्थानची फलंदाजी बाजू कोसळली होती, पण रियानच्या खेळीमुळे संघाने चांगली धावसंख्या उभारली आणि विजय मिळवला. तर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ५४ धावांची नाबाद खेळी खेळली. यासह त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये ३ सामन्यांत १८१ धावा करत विराटची बरोबरी केली आणि ऑरेंज कॅप मिळवली.

रियानने गेल्या काही वर्षात राजस्थानसाठी फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. पण या हंगामात मात्र तो चांगल्या लयीत आहे. मुंबई इंडियन्सविरूद्धच्या शानदार खेळीनंतर रियान परागने सांगितले की त्याने त्याच्या खेळात सुधारणा कशी केली. रियान म्हणाला, “खरं तर काहीच बदललं नाही. फक्त मी गोष्टी अधिक सहज सोप्या केल्या. सुरूवातीला सगळ्याच गोष्टींचा खूप विचार करायचो, पण आता लक्ष्य एकच आहे की चेंडू पाहून फटकेबाजी करायची. मी देशांतर्गत क्रिकेटमध्येही याच क्रमांकावर फलंदाजीला उतरतो. गेली ३-४ वर्ष मी आयपीएलमध्ये फारशी चांगली कामगिरी करू शकलो नाही. असं जेव्हा घडतं त्यावेळेस आपण कुठे चुकलो याचा विचार करतो. मी खूप सराव केला आणि अशा परिस्थितीत कशी चांगली कामगिरी करायची याचा अभ्यासही केला.”