IPL 2024, Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants: लखनऊ सुपरजायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवसोबतच विराट कोहलीला बाद करणारा मणिमरन सिध्दार्थही सध्या चर्चेत आहे. मणिमरन सिद्धार्थला आरसीबी विरूद्ध लखनऊच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या या सामन्यात त्याने ३ षटके टाकत २३ धावांत १ विकेट घेतली. सिध्दार्थने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट म्हणून विराट कोहलीला बाद केले. जो यंदाच्या मोसमात जबरदस्त फॉर्मात असून ऑरेंज कॅपही त्याच्याकडे आहे.

तामिळनाडूचा हा फिरकीपटू त्याचा फक्त दुसरा आयपीएल सामना खेळत होता आणि विराट कोहली त्याच्या कारकिर्दीतील पहिला विकेट ठरला. लखनऊशिवाय, सिद्धार्थ दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातही होता, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएलसाठी २०२३ मध्ये झालेल्या लिलावात लखनऊ आणि आरसीबीने त्याच्यावर बोली लावली. पण अखेरीस लखनऊने सिद्धार्थला २.४ कोटी रुपये खर्चून संघात सामील केले. देशांतर्गत क्रिकेटमध्येही या फिरकीपटूने अप्रतिम गोलंदाजी केली आहे.

सिद्धार्थने तामिळनाडूसाठी ७ प्रथम श्रेणी आणि १७ लिस्ट ए सामने खेळले आहेत. सिद्धार्थने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २७ आणि लिस्ट ए मध्ये २६ विकेट घेतल्या आहेत.

जगभरातील गोलंदाजांसाठी काळ असलेला विराट कोहली हा आर्म बॉलसमोर नेहमीच डगमगताना दिसतो. असेच काहीसे सिद्धार्थसमोर फलंदाजी करताना दिसले.लखनऊच्या सामन्यात सिद्धार्थ ५वे षटक टाकण्यासाठी आला होता. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विराटने लेग साईडवर शॉट मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅकवर्ड पॉईंटकडे गेला आणि देवदत्त पडीक्कलने तो झेल टिपला. त्यामुळे १६ चेंडूत २२ धावा करून विराट बाद झाला.