IPL 2024, Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders: आयपीएल २०२४ मधील कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहलीने ८३ धावांची दमदार इनिंग खेळली. मात्र, विराट कोहलीची ही अर्धशतकी खेळीही आरसीबीच्या पराभवाचे कारण ठरली, असे चाहत्यांचे म्हणणे असून सोशल मिडियावर ही चर्चा सुरू आहे. या सामन्यात विराट कोहलीने ५९ चेंडूंचा सामना करत ८३ धावा केल्या. कर्णधार फाफ डू प्लेसिससोबत सलामीला आलेला विराट कोहली नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुमारे १० षटके फलंदाजी करणाऱ्या विराटला त्याच्या डावात केवळ ८ चौकार लगावता आले, ज्यात ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. १४०च्या स्ट्राईक रेटने शानदार खेळी करणाऱ्या विराटवर सामन्यानंतर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

१४०.६८ च्या प्रभावी स्ट्राइक रेटने धावा करूनही चाहत्यांनी प्रश्न केला आहे की विराटने अगदी सुरुवातीपासूनच स्फोटक फलंदाजी करायला हवी होती. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर कोहलीने बेंगळुरूच्या धावसंख्येची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस ६ धावांवर बाद झाल्याने कोहलीवर अधिक दबाव आला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कॅमेरॉन ग्रीनने कोहलीसोबत ६५ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव उचलून धरला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने १९ चेंडूत २८ धावांची खेळी केली.

विराट कोहलीच्या या सामन्यातील अर्धशतकी खेळीनंतर त्याला ऑरेंज कॅपही मिळाली. विराट कोहलीने या मोसमात ३ सामन्यात १८१ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने KKR विरुद्ध फलंदाजी करताना धमाकेदार सुरुवात केली, विराट कोहलीने पहिल्या २० चेंडूत ४० धावा पूर्ण केल्या होत्या. तोपर्यंत त्याचा स्ट्राईक रेट २०० होता, पण यानंतर विराट कोहली संथ खेळताना दिसला. विराट कोहलीला पुढील ४३ धावा करण्यासाठी ३९ चेंडू लागले. याचा परिणाम असा झाला की, खूप प्रयत्न करूनही आरसीबी संघ निर्धारित २० षटकांत केवळ १८३ धावा करू शकला. यामुळेच KKR संघाने १९ चेंडू बाकी असताना ७ विकेट्सने सामना जिंकला.

या विजयासह कोलकाताने चिन्नास्वामी स्टेडियमवरील आरसीबीविरूध्द विजय मिळवण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे. गेल्या सलग ६ सामन्यांमध्ये केकेआरने आरसीबीवर विजय मिळवला आहे. आयपीएल २०२४ मध्ये पहिल्या सामन्यापासून घरच्या मैदानावर सामना खेळणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. पण केकेआर संघ यंदाच्या मोसमात इतर संघाच्या घरच्या मैदानावर विजय मिळवणारा पहिला संघ ठरला आहे.