यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आतापर्यंतचा प्रवास खूपच खडतर राहिला आहे. संघाला सातपैकी सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. आरसीबीच्या गोलंदाजांनी तर संघाला प्रत्येक सामन्यात निराश केले आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवणं संघासाठी खूप मोठे आव्हान असणार आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादकडून संघाला हंगामातील सहावा पराभव स्वीकारावा लागला. तेव्हापासून सगळीकडेच आरसीबीच्या पराभवाचीच चर्चा होत आहे. याच दरम्यान माजी दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही संघाच्या कामगिरीबाबत वक्तव्य करत या संघाची सर्वात मोठी कमजोरी दाखवली.

– quiz

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सनरायझर्स हैदराबादने त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले. आयपीएल २०२४ मधील आरसीबीचा हा सहावा पराभव होता. या पराभवानंतर वीरेंद्र सेहवागने संघाची सर्वात मोठी कमजोरी सांगितली आहे. याविषयी बोलताना सेहवाग म्हणाला, “जर तुमच्या संघात १२ ते १५ खेळाडू आहेत आणि फक्त १० विदेशी खेळाडू आहेत. याशिवाय तुमचा संपूर्ण स्टाफमध्येही विदेशी खेळाडू आणि व्यक्ती असतील तर ही समस्या आहे. त्यातील मोजकेच आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. इतर सर्व भारतीय आहेत आणि त्यातील निम्म्या संघाला तर इंग्लिशही समजत नाही. तर मग चांगली कामगिरी करण्यासाठी तुम्ही त्यांना कसं प्रोत्साहित कराल? त्या खेळाडूंसोबत वेळ कसा घालवणार, त्यांच्याशी संवाद कसा साधणार? मी त्यांच्या ताफ्यात एकही भारतीय स्टाफ अद्याप पाहिलेला नाही. कमीत कमी एकतरी भारतीय सपोर्ट स्टाफ हवा ज्याच्यासोबत खेळाडू मोकळेपणाने बोलू शकतील.

आरसीबीच्या या अवस्थेला ते स्वतच जबाबदार असल्याचे मनोज तिवारीचे मत आहे. तो म्हणाला, “मला माहित आहे की समस्या नेमकी काय आहे. ही समस्या लिलावापासून ते संघ व्यवस्थापनापर्यंत आहे. या फ्रँचायझीचे सर्व चांगले खेळाडू संघ सोडून गेले आहेत आणि आता ते इतर संघांसाठी खेळत आहेत. त्यापैकी एक आहे युझवेंद्र चहल, ज्याने यंदाच्या मोसमात सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. आरसीबीने विराटच्या कर्णधारपदावर विश्वास दाखवला नाही. २०१६ मध्ये विराटच्या नेतृत्त्वाखालील आरसीबीने अंतिम सामना खेळला होता.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये फक्त एकच सामना जिंकला आहे. यासोबतच संघाने सलग ५वा सामना गमावला आहे. आता या संघाला या हंगामात आणखी ७ सामने खेळायचे आहेत. त्यामुळे संघाचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा रस्ता अवघड आहे. संघाला जर प्लेऑफमध्ये जायचे असेल तर पुढील सर्व सामने जिंकून गुणांची भर घालावी लागेल.