चेन्नई सुपर किंग्सचा ‘थाला’ एस एस धोनीने दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात आपल्या जुन्या अंदाजात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. धोनी या सामन्यात फलंदाजीला आला होता आणि त्याने अवघ्या १६ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३७ धावांची शानदार इनिंग खेळली. पण या सामन्यानंतरचा धोनीचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धोनीच्या पायाला बर्फाची पट्टी घट्ट बांधली होती, कारण त्याला चालताना त्रास होत होता.

धोनीच्या या व्हीडिओमध्ये तो युवा खेळाडूंशी बोलून झाल्यानंतर मैदानातील कर्मचाऱ्यांकडे जाताना दिसत आहे. धोनीने सामन्यानंतर विशाखापट्ट्णम स्टेडियममधील कर्मचाऱ्यांसोबत फोटो काढला. या सामन्यात धोनीने ३७ धावांची खेळी केली पण धोनी संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. दिल्लीने दिलेल्या १९२ धावांचा पाठलाग करताना चेन्नई संघ ६ बाद १७१ धावा केल्या होत्या.

सीएसकेने दिल्लीविरूद्धचा हा सामना गमावला असला तरी धोनीने मात्र सामन्याचा रोख पुरता बदलला होता.दिल्लीने २० धावांनी सामना जिंकला असला तरी धोनीच्या खेळीने मात्र सर्वांची मने जिंकली.नॉर्कियाच्या अखेरच्या षटकात दुसऱ्या चेंडूवर धोनीने एका हाताने शानदार षटकार लगावला. धोनीची खासियत असलेला हा शॉट खेळणे अजिबातच सोपी गोष्ट नव्हती. त्याच्या या षटकारानंतर मैदानात एकच जल्लोष पाहायला मिळाला.

४२ वर्षीय धोनी हा त्याच्या चाहत्यांसाठी वर्षभर सराव करून पुन्हा खेळण्यासाठी फिट केले आहे. पण त्याच्या गुडघ्याच्या दुखणे आणि इतर त्रासांना त्याला या दरम्यान सामोरे जावे लागत आहे. पण चाहत्यांना दिलेले वचन मात्र पूर्ण करतानाही दिसत आहे. धोनीने सामन्यानंतर पायाला बर्फाची पट्ट घट्टी बांधली होती, जेणेकरून त्याच्या दुखापतीपासून त्याला आराम मिळेल.

विशाखापट्टणममध्ये २००५ साली झालेल्या सामन्यात लांब केसांचा लुक असलेल्या धोनीने पाकिस्तानविरूद्ध १४८ धावांची शानदार खेळी करत सर्वांची मने जिंकली होती. त्यानंतर आता तब्बल १९ वर्षांनंतर धोनीने पुन्हा एकदा याच मैदानावर चाहत्यांना आपल्या खेळीने भारावून टाकले. तोच लांब केस असलेला धोनी, तेच शहर आणि तशीच तुफान फटकेबाजी.

धोनीने आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर दिली होती. नवा कर्णधार ऋतुराज ही जबाबदारी उत्तमप्रकारे आणि धोनीच्या मार्गदर्शनासह पार पाडत आहे.