IPL 2025 BCCI Rule for Rain Affected Match: आयपीएल २०२५ एका आठवड्याच्या स्थगितीनंतर सुरू झाली आहे. याशिवाय यंदा पावसानेही आयपीएल सामन्यांदरम्यान पावसानेही हजेरी लावली आहे. आयपीएल पुन्हा सुरू झाल्यानंतर आरसीबी वि. केकेआर सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचे सामने आणि प्लेऑफच्या सामन्यांसाठी बीसीसीआयने नवा नियम आणला आहे.

आता लीग टप्प्यात फक्त ९ सामने खेळवले जातील. पण प्लेऑफच्या शर्यतीचा विचार करता, हे सर्व सामने खूप महत्त्वाचे असणार आहेत. पण यावेळी पाऊस आणि पावसाळ्याचा स्पर्धेवर अनेक वेळा परिणाम झाला आहे. पावसामुळे ३ सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. त्यामुळे उर्वरित सामन्यांसाठी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. हवामानातील अनिश्चितता लक्षात घेऊन, सामने निष्पक्ष आणि रोमांचक व्हावेत यासाठी बीसीसीआयने अतिरिक्त वेळेची व्यवस्था लागू केली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल सामन्यासाठी नियोजित अतिरिक्त वेळ एक तासाने वाढवला आहे. २० मे पासून सर्व आयपीएल सामन्यांसाठी १२० मिनिटांचा अतिरिक्त प्रतीक्षा वेळ असेल. पूर्वी, हा कालावधी फक्त एक तास होता आणि बीसीसीआयने सांगितले की खेळण्याच्या परिस्थितीत बदल (कलम १३.७.३) तात्काळ प्रभावाने लागू होत आहे. बीसीसीआयने सर्व संघांना या बदलाची माहिती दिली आहे.

या निर्णयानंतर, ५ षटकांच्या सामन्यासाठी कटऑफ वेळ भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० ऐवजी रात्री ११.३० असेल. दुपारच्या सामन्याचा कटऑफ वेळ भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.५० वरून ७.५६ वाजेपर्यंत बदलण्यात आला आहे.

बीसीसीआयने एक निवेदन जारी करताना म्हटलं आहे की, ‘प्लेऑफ स्टेजप्रमाणे, मंगळवार, २० मे पासून सुरू होणाऱ्या लीग स्टेजच्या उर्वरित सामन्यांसाठी खेळाची स्थिती पाहता अतिरिक्त एक तास दिला जाईल.’ पूर्वी, सामन्यांच्या अटींमध्ये असे नमूद केले होते की लीग सामन्यांसाठी, विलंब झाल्यास पुन्हा सामना सुरू करण्यासाठी ६० मिनिटांचा अतिरिक्त वेळ उपलब्ध होता. प्लेऑफ सामन्यांमध्ये ही वेळ १२० मिनिटांपर्यंत वाढवली जात असे. पण आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने आता त्यात बदल केला आहे.