How Can Mumbai Indians Qualify for IPL 2025 Playoffs: आयपीएल २०२५ चं प्लेऑफसाठी ३ संघ पात्र ठरले असले तरी एका स्थानासाठी अजूनही ३ संघ शर्यतीत आहेत. आयपीएलमधील ६० व्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर १० विकेट्सने एकतर्फी पराभव केला. गुजरातने १९ षटकांत २०० धावांचे लक्ष्य गाठले. यानंतर गुजरातचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला.

गुजरात टायटन्सबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्सचे संघही यंदाच्या आयपीएल प्लेऑफसाठी अधिकृतपणे पात्र ठरले आहेत. आरसीबी आणि पंजाबचे संघ क्वालिफाय होण्याच्या उंबरठ्यावर होते. पण गुजरातने दिल्लीचा पराभव करताच ३ संघांचं गणित अधिक सोपं झालं आणि तिन्ही संघ १६ पेक्षा जास्त गुण असल्याने क्वालिफाय झाले.

गुजरात टायटन्सकडून डावखुरा सलामीवीर साई सुदर्शनने ६१ चेंडूत १२ चौकार आणि चार षटकारांसह १०८ धावा केल्या आणि कर्णधार शुभमन गिलने ५३ चेंडूत ९३ धावा केल्या. गिलने क्रीजवर असताना तीन चौकार आणि सात षटकार मारले आणि या जोडीने पहिल्या विकेटसाठी २०५ धावांची भागीदारी केली आणि दिल्ली कॅपिटल्सवर गुजरातने सहज विजय मिळवला.

गुजरातचा संघ १२ सामन्यांनंतर १८ गुणांवर आहेत, तर आरसीबी आणि पंजाब किंग्सचे १२ सामन्यांतून प्रत्येकी १७ गुण आहेत. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स अनुक्रमे १४, १३ आणि १० गुणांसह चौथ्या, पाचव्या आणि सातव्या स्थानावर आहेत आणि उर्वरित एका स्थानासाठी या तिन्ही संघांमध्ये चढाओढ असणार आहे.

मुंबई-लखनौ-दिल्लीमध्ये चौथ्या स्थानासाठी रस्सीखेच

आता प्लेऑफमध्ये एका स्थानासाठी दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात लढत आहे. या ३ संघांपैकी फक्त मुंबई १८ गुणांचा आकडा गाठू शकते. मुंबई आणि दिल्लीमध्ये सामना होणार असल्याने दोघांपैकी फक्त एकच संघ १७ किंवा त्याहून अधिक गुण मिळवू शकेल.

तिसरा स्पर्धक लखनौ संघ आहे, जो १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. मुंबईची स्थिती मजबूत आहे. १८ गुण मिळवण्यासाठी मुंबईला पंजाब आणि दिल्लीला हरवावे लागेल. जर असं झालं तर दिल्ली १७ गुणांपर्यंत पोहोचू शकणार नाही. तिन्ही सामने जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी लखनौला आशा करावी लागेल की दिल्ली आणि मुंबई १६ किंवा त्याहून अधिक गुणांपर्यंत पोहोचणार नाहीत.

जर दिल्ली संघाचा मुंबईने पराभव केला तर दिल्ली स्पर्धेतून बाहेर पडेल. जर दिल्ली जिंकली तर मुंबईला पंजाबविरुद्धचा शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल आणि दिल्लीने त्यांचा शेवटचा लीग सामना पंजाबविरुद्ध गमवावा अशी आशा करावी लागेल. तर लखनौ उर्वरित तीन सामन्यांपैकी किमान एक सामना हरेल अशी आशा करावी लागेल.

टॉप-२ साठी संघांमध्ये असणार चढाओढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरात टायटन्सने २२ मे रोजी लखनौ आणि २५ मे रोजी चेन्नईविरुद्धचे उर्वरित दोन सामने जिंकल्यास ते टॉप-२ मध्ये कायम राहतील आणि २९ मे रोजी होणाऱ्या पहिल्या क्वालिफायरमध्ये खेळतील. जर गुजरातने एक सामना गमावला आणि पंजाब किंवा आरसीबीने त्यांच्या उर्वरित लीग सामन्यांपैकी एक सामना गमावला, तरीही गुजरात अव्वल दोनमध्ये राहील. पण इतर संघांचे निकालही गुजरातच्या टॉप-२ मध्ये असण्यावर परिणाम करतील. लीग टप्प्याच्या शेवटी अव्वल दोन संघांना अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्याच्या दोन संधी असतील.