नवी दिल्ली : ‘आयपीएल’सारख्या स्पर्धेत वयाच्या १४व्या वर्षी विक्रमी शतक साकारल्यानंतर तुमच्या नावाची चर्चा होणारच. हेच वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत घडते आहे. तुमच्या खेळाबाबत सातत्याने मत व्यक्त केले जाणार. ही परिस्थिती युवा खेळाडूसाठी निश्चितच अनुकूल नाही. मात्र, काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या असतात. तुम्हाला या सगळ्याकडे दुर्लक्ष करावे लागते, असे राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला.
यंदा ‘आयपीएल’मध्ये पदार्पण केल्यापासूनच वैभव सूर्यवंशी चर्चेत आहे. डावखुरा सलामीवीर वैभवने पदार्पणातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारत सर्वांना अवाक केले. त्यानंतर आपल्या तिसऱ्या ‘आयपीएल’ सामन्यात त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध केवळ ३५ चेंडूंत शतक साकारत संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे गेले दोन दिवस केवळ वैभवच्याच नावाची चर्चा आहे. बुधवारी द्रविडने ‘स्टार स्पोर्ट्स प्रेस रूम’मध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी द्रविडला विचारण्यात आलेले बहुतेक प्रश्न वैभवबाबतच होते.
‘‘सध्या सर्वत्र वैभवची चर्चा आहे. यापासून आम्ही कोणाला रोखू शकत नाही. वैभवसाठी हे मोठे आव्हान आहे. मात्र, हा अनुभव त्याच्यासाठी रोमांचकही आहे. लहान वयातच त्याच्याकडे इतक्या लोकांचे लक्ष असणे अनुकूल आहे का? निश्चितच नाही. परंतु त्याचे वय आणि त्याची कामगिरी पाहता त्याच्या नावाची चर्चा होणार नाही असा विचार करणे भाबडेपणाचे ठरेल. संघ व्यवस्थापन म्हणून आम्ही त्याला अधिकाधिक पाठिंबा देण्याचा आणि बाहेरील लोकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत,’’ असे द्रविडने सांगितले.
दरम्यान, द्रविडने वैभवच्या शैली आणि क्षमतेबाबतही भाष्य केले. ‘‘वैभव अतिशय निडर आहे. समोर कोणीही गोलंदाजी करत असला तरी तो घाबरून जात नाही. चेंडूचा टप्पा लवकर ओळखण्याची त्याची क्षमता विलक्षण आहे. तसेच त्याच्याकडे वैविध्यपूर्ण फटकेही आहेत. त्याच्या वयाच्या खेळाडूत या गोष्टी सहसा पाहायला मिळत नाहीत. मात्र, तो परिपूर्ण खेळाडू आहे असे मी इतक्यातच म्हणणार नाही. त्याच्या खेळात सुधारणेला बराच वाव आहे. त्यामुळे त्याच्याबाबत मत बनविण्याची घाई करणे योग्य ठरणार नाही,’’ असे द्रविडने नमूद केले.