Jitesh Sharma Wife Shalaka Makeshwar : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील साखळी फेरीचा अखेरचा सामना मंगळवारी ( २७ एप्रिल ) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये पार पडला. या सामन्यात आरसीबीने लखनौवर ६ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाचा शिल्पकार जितेश शर्मा ठरला. हा सामना विराटच्या आरसीबीसाठी अतिशय महत्त्वाचा होता. कारण, या सामन्यातील विजयामुळेच त्यांनी आयपीएलच्या गुणतालिकेत टॉप २ मध्ये स्थान मिळवलं आहे.
ऋषभ पंतच्या शतकी खेळीनंतर लखनौने आरसीबीसमोर २२८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून कर्णधार जितेश शर्माने शानदार खेळी केली आणि संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. सामनावीर जितेशने अवघ्या ३३ चेंडूत तब्बल ८५ धावा केल्या. या नाबाद खेळीत त्याने ८ चौकार आणि सहा षटकार मारले. या वादळी खेळीनंतर सध्या जितेश शर्मा सर्वत्र चर्चेत आला आहे. त्याच्या पत्नीने देखील खास पोस्ट शेअर करत जितेशचं कौतुक केलं आहे.
जितेश शर्माच्या पत्नीचं नाव शलाका मकेश्वर असं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने M.Tech केलं आहे. सध्या ती एका सॉफ्टवेअर कंपनीत, सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहे. जितेशच्या वादळी खेळीनंतर शलाकाने खास पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे.
शलाकाने इन्स्टाग्रामवर, “माय फॉरएव्हर फायरक्रॅकर… ३३ चेंडूत ८५ नाबाद धावा…तू मॅजिक केलीस” अशी पोस्ट शेअर करत जितेशचं कौतुक केलं आहे. पत्नीची ही पोस्ट जितेशने देखील स्टोरीवर रिशेअर केली आहे.

सध्या जितेश शर्माच्या दमदार खेळीचं सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. सूर्यकुमार यादवने देखील खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, जितेशच्या दमदार खेळीमुळे आरसीबीने क्वालिफायर १ मध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांचा सामना अव्वल स्थानी असलेल्या पंजाब किंग्ज संघाविरूद्ध होणार आहे.