RCB All Reacords in IPL : आयपीएल २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात असून या सामन्यात बंगळुरूने पंजाबसमोर प्रथम फलंदाजी करताना १९० धावांचा डोंगर उभा केला आहे. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत रजत पाटीदारच्या बंगळुरूला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने निर्धारित २० षटकांत ९ बाद १९० धावांचा डोंगर उभा केला आहे.
या सामन्यात पंजाबचा जलदगती गोलंदाज काईल जेमिसन व अर्शदीप सिंगने प्रत्येकी ३ बळी घेत बंगळुरूचं कंबरडं मोडलं. मात्र, बंगळुरूच्या फलंदाजांनी या दोन्ही गोलंदाजांची चांगलीच धुलाई देखील केली. या दोघांना अझमतुल्लाह ओमरझाई, युजवेंद्र चहल व विजयकुमार वैशाख या तिघांनी प्रत्येकी एक बळी घेत चांगली साथ दिली. वैशाखने चार षटकात केवळ ३० धावा दिल्या. तो पंजाबचा किफायतशीर गोलंदाज ठरला.
बंगळुरूची मधली फळी अपयशी
दुसऱ्या बाजूला बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा जमवल्या. विराटला आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार (२६), जितेश शर्मा (२४), लियाम लिव्हिंगस्टन (२५), मयंक अग्रवाल (२४) या चौघांनी उत्तम साथ दिली. परंतु, चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही यांच्यापैकी कोणालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. परिणामी बंगळुरूचा संघ २०० धावांचा टप्पा गाठू शकला नाही.
जेमिसनच्या यॉर्करसमोर पाटीदार अपयशी
बंगळुरूचा संघ अडचणीत असताना डाव सावरण्यासाठी खेळपट्टीवर उतरलेल्या बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने काइल जेमिसनविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याने, ११ व्या षटकात जेमिसनला षटकार लगावत त्याचा निर्धार स्पष्ट केला. मात्र, जेमिसनच्या पुढच्या चेंडूवर त्याला धाव घेता आली नाही. त्यापुढच्या चेंडूवर जेमिसनने एका सुंदर यॉर्कर लेंथ चेंडूवर पाटीदारला पायचित पकडलं. जेमिसनचा चेंडू इतका उत्कृष्ट होता की पाटीदार व विराट कोहलीने रिव्ह्यू घेण्याचा विचारही केला नाही.