RCB vs PBKS head-to-head records in IPL History : आयपीएल २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना आज (३ जून) संध्याकाळी ७.३० वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार असून या सामन्यात पंजाब किंग्ज व रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे दोन संघ एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. पंजाब किंग्जने रविवारी याच मैदानावर खेळवण्यात आलेल्या समन्यात मुंबईवर थरारक विजय मिळवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर, बँगलोरने आधीच क्वालिफायर १ सामन्यात पंजाबवर मात करत अंतिम फेरी गाठली आहे. या दोन्ही संघांनी आजवर कधीही आयपीएल चषक उंचावलेला नाही. त्यामुळे आज क्रिकेटरसिकांना नवा विजेता मिळणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आतापर्यंत तीन वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. मात्र, तिन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या संघाला २००९ साली डेक्कन चार्जर्स हैदराबाद, २०११ मध्ये चेन्नई सुपरकिंग्ज, २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या फायनलमध्ये धूळ चारली होती. तर, पंजाबने २०१४ मध्ये आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यावेळी या संघाला कोलकाता नाइट रायडर्सने मात दिली होती.
यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत कोण ठरलं वरचढ?
दरम्यान, पंजाब आणि बँगलोर या दोन संघांनी आतापर्यंत आयपीएल जेतेपद पटकावलेलं नसलं तरी हे दोन्ही संघ यंदा तुल्यबळ आहेत. आयपीएल २०२५ मध्ये पंजाब व बँगलोर सुरुवातीपासून गुणतालिकेत सर्वात वर होते. साखळी फेरीअखेर दोन्ही संघ पहिल्या व दुसऱ्या स्थानावर होते. या दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत सर्वच संघांवर वर्चस्व राखलं. त्यामुळेच आज दोन्ही संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाले आहेत.
आजच्या अंतिम सामन्यात पंजाबविरोधात बँगलोरचं पारडं जड आहे. कारण, यंदाच्या हंगामात दोन्ही संघ तीन वेळा भिडले आहेत. त्या तीन पैकी दोन सामन्यात आरसीबीने विजय मिळवला आहे. तर, एका सामन्यात पीबीकेएसची सरशी झाली होती. गेल्या आठवड्यात (शुक्रवार, ३० मे ) उभय संघांमध्ये स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात बँगलोरने पंजाबवर १० षटके व ८ गडी राखून मात केली होती. या विजयासह रजत पाटीदारचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला. तसेच गुणतालिकेतही बँगलोरचा संघ पहिल्या स्थानी तर पंजाबचा संघ दुसऱ्या स्थानी होता.
बँगलोर व पंजाबची आजवरची एकमेकांविरोधातील कमगिरी (RCB vs PBKS head-to-head record in IPL)
- दोन्ही संघांनी आयपीएल इतिहासात आतापर्यंत एकमेकांविरोधात ३६ सामने खेळले आहेत. यापैकी १८ सामने पंजाबने तर १८ सामने बँगलोरने जिंकले आहेत.
- बँगलोरचा संघ तीन वेळा आयपीएल फायनल खेळला आहे. या तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
- पंजाबने केवळ एकदाच आयपीएलची फायनल गाठली असून या सामन्यात ते देखील पराभूत झाले होते.
- आरसीबीचा संघ आतापर्यंत १५ प्लेऑफ सामने खेळला असून यापैकी केवळ ५ सामने त्यांनी जिंकले आहेत. तर १० सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला आहे.
- तर पंजाबचा संघ आतापर्यंत ६ प्लेऑफ सामने खेळला आहे. यापैकी केवळ ३ सामने त्यांनी जिंकले आहेत. तर ३ सामन्यांमध्ये हा संघ पराभूत झाला आहे.