बीसीसीआयने खेळाडूंना “देशांतर्गत क्रिकेटपेक्षा आयपीएल” मध्ये खेळण्यास अधिक महत्त्व देत असल्याने रणजी सामने खेळणे आवश्यक असल्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याचा गंभीरपणे विचार न केल्याने दोन भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून बाहेर केले. हे दोघे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर नसल्याने त्यांनी प्रथम देशांतर्गत क्रिकेटचे सामने म्हणजेच सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेला प्रथम प्राधान्य देणे महत्त्वाचे होते. पण यांनी तसे न केल्याने त्यांना मोठा फटका बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन एक्स्प्रेसने विश्लेषित केलेल्या संघ याद्यांमध्ये असे समोर आले की शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या IPL 2024 साठी साइन अप केलेल्या १६५ भारतीय क्रिकेटपटूंपैकी ५६ खेळाडू या आठवड्यात संपलेल्या रणजी हंगामातील एकाही सामन्यासाठी संघाचा भाग नव्हते. तर इतर २५ खेळाडू फक्त एकाच सामन्यात दिसले.

– quiz

“ही चिंतेची बाब आहे. वेगवान गोलंदाज (जे दुखापतग्रस्त आहेत)वगळता अगदी आयपीएल करार मिळवलेले फलंदाज रणजी ट्रॉफी खेळू इच्छित नाहीत. आम्ही बीसीसीआयला रणजी ट्रॉफीनंतर आयपीएल लिलाव आयोजित करण्याची विनंती केली आहे. यामुळे आम्हाला संघांना याचा फटका बसत आहे.,” असे जम्मू आणि काश्मीर राज्य युनिट चालवणाऱ्या प्रशासनाचा भाग असलेले ब्रिगेडियर अनिल गुप्ता म्हणाले.

क्रिकेटपटू हे चार दिवसांच्या रणजी सामन्यात खेळत नाहीत जेणेकरून ते दुखापतीपासून बचावतील आणि चार तासांच्या आयपीएलमध्ये खेळू शकतील, असे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. पण मग, मोठा प्रश्न हा आहे की यासाठी फक्त खेळाडूच दोषी आहेत का?

“बीसीसीआयने त्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे कोणतेही स्पष्ट धोरण किंवा फिटनेस प्रोटोकॉल नसल्यामुळे, राज्य युनिट्स आयपीएल स्टार्सना प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास भाग पाडण्यात अयशस्वी ठरतात.” असे राज्य युनिटच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दुखापती हे अनेकदा क्रिकेटपटूंनी रणजी न खेळण्याचे अधिकृत कारण असते.

IPL मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या, लखनौ सुपरजायंट्स अष्टपैलू खेळाडू, रणजीमध्ये बडोद्याकडून एकही सामना खेळलेले नाहीत. हार्दिकने शेवटची देशांतर्गत स्पर्धा २०१८ मध्ये खेळली होती. “पांड्या बंधूंनी रणजी न खेळण्याचे कारण आम्हाला अद्याप सांगितले नाही. जेव्हा ते उपलब्ध असतात तेव्हा ते प्रशिक्षक किंवा असोसिएशनच्या अध्यक्षांशी संपर्क साधतात, परंतु त्यांनी बराच काळ रणजी सामने खेळलेले नाहीत. कृणालने या मोसमात बडोद्यासाठी मर्यादित षटकांचे सामने खेळले, तर हार्दिक दुखापतीतून सावरत होता, असे बडोदा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजित लेले यांनी सांगितले.

उमरान मलिकने त्याच्या १५० किमी प्रति तास वेगाच्या चेंडूंसह सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याच्या चर्चेनंतर जम्मू कश्मीरमधील इतर दोन वेगवान गोलंदाज, रसिक सलाम दार आणि युधवीर सिंग चरक यांची आयपीएलसाठी निवड करण्यात आली. त्यानंतर हे दोघेही संपूर्ण रणजी हंगाम खेळले नाहीत. “रसिकला कॅम्पमध्ये दुखापत झाली, तर युधवीरने एलएसजीकडून आलेला वैद्यकीय अहवाल दाखवला की त्याच्या खांद्याला दुखापत आहे. पण आमच्या फिजिओकडून दोघांचीही तपासणी झाली नव्हती. उमराननेही रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास फारसा रस दाखवला नाही.” असे जम्मू आणि काश्मीर युनिटचे ब्रिगेडियर अनिल गुप्ता म्हणाले.

भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले होते की, झारखंडच्या इशान किशनने रणजीमध्ये भारतासाठी पुनरागमन करण्यासाठी खेळावे. पण झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय सहाय म्हणाले, “त्याने कधीही रणजीसाठी स्वत: उपलब्ध असल्याचे कळवले नाही. आम्हाला प्रशिक्षक, निवडकर्ते किंवा बीसीसीआयकडून कोणतेही मार्गदर्शक तत्त्वे मिळालेली नाहीत.”

२०१४ पासून विदर्भासाठी नियमित रणजी खेळणाऱ्या जितेश शर्माला २०२२ मध्ये त्याचा पहिला आयपीएल करार मिळाला. या जानेवारीत, तो प्रथम भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका खेळला आणि त्याच महिन्यात तो एक रणजी सामना खेळला. पण त्यानंतर तो अंतिम फेरीसह नऊ रणजी सामने खेळू शकला नाही. “जितेशने एक वैद्यकीय अहवाल सादर केला होता की त्याला मांडीमध्ये दुखापत आहे, इतकेच आम्हाला माहित आहे. त्याने असोसिएशनला फिटनेस अपडेट दिलेले नाहीत. त्याला दुखापत झाली आहे एवढेच आम्हाला माहित आहे, असे विदर्भाच्या निवड समितीचे अध्यक्ष सुहास फडकर यांनी सांगितले.

दीपक (चेन्नई सुपर किंग्स) आणि राहुल (पंजाब किंग्स) हे दोघेही सख्खे भाऊ रणजी ट्रॉफीमध्ये राजस्थानचे प्रतिनिधित्व करतात. मात्र या मोसमात राहुलने एक आणि दीपकने एकही सामना खेळला नाही. “खेळाडू एकतर रणजी खेळणे निवडतात किंवा त्यांच्या आयपीएल फ्रँचायझींकडून ते दुखापत झाली असल्याचे वैद्यकीय अहवाल सादर करतात. हे वर्षानुवर्षे होत आहे.” असे राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.

चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर आणि मुकेश चौधरी यांनी दुखापतीमुळे या मोसमात एकही रणजी सामना खेळला नाही, परंतु त्यांच्या फिटनेसबद्दल त्यांच्या संघाकडे महाराष्ट्राकडे कोणतीच स्पष्ट माहिती नाही.

“हंगरगेकर आणि मुकेश या दोघांनाही दुखापत झाली आहे आणि ते कधी फिट होतील हे आम्हाला माहीत नाही. यंदाच्या मोसमात ते रणजीला मुकण्याचे कारण दुखापत ठरली. मला त्यांच्या दुखापतींचे स्वरूप माहित नाही कारण फिजिओ त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.” गेल्या महिन्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव असलेले शुभेंद्र भांडारकर म्हणाले होते.

मुंबईच्या रणजी विजेत्या संघाचा भाग असलेल्या भूपेन लालवाणीला १० प्रथम श्रेणी सामने खेळण्यासाठी १७,२०,००० रुपये मिळाले. याउलट, गेल्या आयपीएल लिलावात खेळाडूची सर्वात कमी मूळ किंमत २० लाख रुपये होती, ही सुध्दा एक लक्षात घेण्यासारखी बाब आहे.

आयपीएल खेळाडूंची गर्दी असलेल्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये सैय्यद मुश्ताक अली टी-२० आणि ५० षटकांची विजय हजारे ट्रॉफी या लहान स्वरूपातील आहेत. फ्रँचायझींनी टॅलेंट स्काउट्स टीम पाठवल्यामुळे, या स्पर्धा आयपीएल कराराचे प्रवेशद्वार बनल्या आहेत.

भारताचे माजी कर्णधार आणि BCCIचे सर्वोच्च परिषदेचे सदस्य दिलीप वेंगसरकर यांच्या मते, प्रथम श्रेणी क्रिकेट तुम्हाला एक चांगला क्रिकेटपटू बनवते. ते म्हणाले, “क्रिकेटच्या मोठ्या फॉरमॅचमधील स्पर्धा तुम्हाला मानसिकरित्या कणखर बनवते आणि स्वभाव विकसित करण्यास मदत करते, जे तुम्हाला लहान फॉरमॅटमध्येही एक चांगला क्रिकेटपटू बनण्यास मदत करते.”

खरं तर, आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणारे १० फलंदाज हे १०० पेक्षा जास्त प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत तर उत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीतील किमान आठ गोलंदाजांनी असे ५० पेक्षा जास्त सामने खेळले आहेत.

“१९ वर्षांपेक्षा कमी वयाच्या क्रिकेटपटूंना टी-२० फॉरमॅट खेळण्याची परवानगी दिली जाऊ नये, असे माझे ठाम मत आहे. आजकाल असं चित्र दिसतंय की शालेय क्रिकेटमध्येही ते फक्त टी -२० फॉर्मेटमधील सामने खेळले जातात.” असे वेंगसरकर म्हणाले. ज्यांनी स्वत ११६ कसोटी सामने खेळले आहेत आणि बीसीसीआयचे निवडकर्ते असताना विराट कोहलीमधील चमक त्यांनी ओळखली होती.

काही आयपीएल फ्रँचायझी असं म्हणतात की ते त्यांच्या क्रिकेटपटूंना मोठ्या फॉरमॅटमधील सामने खेळण्याचा आग्रह धरतात. “आम्ही या खेळाडूंना रणजी खेळण्याचा आग्रह करतो कारण अशा प्रकारे तुम्ही क्रिकेटपटू म्हणून तुम्ही अधिक प्रगती करता.” असे सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले.

उत्तराखंड रणजी प्रशिक्षक मनीष झा यांच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गेल्या महिन्यात दिलेला इशारा अगदी योग्य वेळी दिला होता. “यामुळे रणजी करंडक वाचला आहे कारण खेळाडूंना देशाच्या प्रमुख देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळण्यात खरोखर रस नव्हता. आयपीएलमुळे भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये अराजकता निर्माण होत आहे.” असे झा म्हणाले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl vs ranji trophy indian crickets new challenge is to address players skipping domestic cricket bdg
First published on: 22-03-2024 at 16:28 IST