प्ले ऑफचे आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला असला तरी राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेला १२ लाख रुपयांचा दंड ठोठाववण्यात आला आहे. षटकांची गती धीमी राखल्याबद्दल अजिंक्यला हा दंड ठोठावण्यात आला आहे.

वानखेडे स्टेडियमवर रविवारी रात्री झालेल्या सामन्यात जोस बटलरच्या नाबाद ९४ धावांच्या खेळीच्या बळावर राजस्थानने गतविजेत्या मुंबईवर सात विकेट राखून विजय मिळवला. भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या बटलरने आयपीएलमधील सलग पाचवे अर्धशतक ठोकले.  मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात षटकांची गती धीमी राखल्याबद्दल राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात येत आहे असे आयपीएलने प्रसिद्धीस दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. आयपीएलच्या आदर्श अचारसंहितेनुसार षटकांच्या गतीबद्दल जो नियम आहे त्यामध्ये राजस्थानच्या संघाने यंदाच्या मोसमातील पहिलेच उल्लंघन केले आहे.

मंगळवारी इडन गार्डन्सवर राजस्थान रॉयल्सचा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सामना होणार आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थानचा संघ पाचव्या आणि कोलकाताची टीम चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे पराजय कुठल्याही संघाचे प्लेऑफचे गणित बिघडवू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी मागच्या महिन्यात चेन्नई विरुद्धच्या सामन्यात षटकांची गती धीमी राखल्याबद्दल विराट कोहलीला तब्बल १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना विराटच्या संघाने आठ बाद २०५ धावांचा डोंगर उभा केला.पण एमएस धोनीने ३४ चेंडूत ७० धावांची तुफानी खेळी करुन आरसीबीच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. आयपीएलच्या आदर्श अचारसंहितेनुसार षटकांची गती राखण्याबाबतचे जे नियम आहेत त्यामध्ये यंदाच्या मोसमात आरसीबीने पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यासाठी कोहलीला १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. असे आयपीएलच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.