Josh Hazlewood Comeback: आयपीएल २०२५ स्पर्धेतील क्वालिफायरचा सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू पूर्ण जोर लावताना दिसून येतील. दरम्यान या महत्वाच्या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघातील प्रमुख गोलंदाज या सामन्यात कमबॅक करताना दिसून येणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा या हंगामातील सर्वात यशस्वी गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतीमुळे काही सामने बाहेर होता. मात्र, आता तो कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. हेजलवूडने या हंगामातील १० सामन्यांमध्ये १८ गडी बाद केले आहेत.

मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यापूर्वी कर्णधार जितेश शर्माने हेजलवूडच्या कमबॅकबाबत मोठी अपडेट दिली होतो. नाणेफेकीच्या वेळी बोलताना जितेश म्हणाला, ” जोश हेजलवूड पुढील सामन्यात कमबॅक करेन. तो आमच्या संघातील प्रमुख गोलंदाज आहे. तो महत्वाच्या सामन्यात कमबॅक करतोय.”

जोश हेजलवूडसह संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू टीम डेव्हिड देखील फिट झाला असून, कमबॅक करणार असल्याचे संकेत जितेश शर्माने दिले आहेत. टीम डेव्हिडने मोक्याच्या क्षणी खालच्या फळीत फलंदाजीला येऊन महत्वपूर्ण धावा केल्या आहेत. त्यामुळे हे दोघे जर परतले तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची ताकद दुपटीने वाढेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स संघाला पराभूत करून या संघाने गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजयासाठी २२८ धावांचे आव्हान होते. या धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने ५४ धावांची खेळी केली. तर कर्णधार जितेश शर्माने नाबाद ८५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ६ गडी राखून विजय मिळवला. आता पंजाब किंग्जला पराभूत करून हा संघ अंतिम फेरीत धडक देण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.