Why Kagiso Rabada Left IPL 2025 Midway: आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्स संघाने कागिसो रबाडाला संघात सामील केले होते. सुरूवातीच्या सामन्यांमध्ये रूबाडा संघाकडून खेळतानाही दिसला. पण सीझनच्या मध्यातच अचानक रबाडा मायदेशात परतला, यामागचं कारण कोणालाच माहित नव्हतं. पण आता स्वत: रबाडाने यामागील कारणाचा खुलासा केला आहे. ड्रग्ज टेस्टमध्ये अडकल्यानंतर रबाडाला अचानक आयपीएल सोडून दक्षिण आफ्रिकेला परतावे लागले. रबाडाने आपली चूक मान्य करत एक निवेदन जारी केले आहे.

गुजरात टायटन्सने रबाडाला १०.७५ कोटी रुपयांना खरेदी केले होते आणि तो या हंगामात फक्त २ सामने खेळू शकला. यानंतर, अचानक २ एप्रिलला, रबाडा आयपीएल अर्ध्यावर सोडून देशात परतला. त्यानंतर असे म्हटले गेले की तो वैयक्तिक कारणांमुळे परतला आहे. पण आता खरं कारण समोर आलं आहे.

आज ३ मे रोजी रबाडाने दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर्स असोसिएशन (एसएसीए) चा हवाला देत एक निवेदन जारी केले आणि म्हटले की, त्याचा रिक्रिएशनल ड्रग्ज टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला अचानक आयपीएलमधून माघारी परतावे लागले. या पॉझिटिव्ह रिपोर्टमुळे सध्या रबाडाला तात्पुरते निलंबित केल्याचेही त्याने सांगितले.

रबाडाने त्याच्या निवेदनात म्हटले आहे की, “वृत्तानुसार, अलिकडेच मी आयपीएल सोडून वैयक्तिक कारणांमुळे दक्षिण आफ्रिकेला परतलो. यामागचं कारण म्हणजे रिक्रएशनल ड्रग्जच्या वापरामुळे माझा रिपोर्ट चांगला आलेला नाही. मी ज्यांना निराश केले आहे त्यांची मी माफी मागतो. मी क्रिकेट खेळण्याची मला मिळालेली संधी मी कधीही साधारण समजलेली नाही. ही संधी माझ्यापेक्षा मोठी आहे. हे माझ्या वैयक्तिक स्वप्नांपेक्षा मोठे आहे. माझ्यावर सध्या तात्पुरते निलंबन आहे आणि यानंतर मी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतण्यास उत्सुक आहे.”

रबाडाने या स्थितीत पाठिंबा दिल्याबद्दल एसएसीए, गुजरात टायटन्स, त्याचे एजंट आणि कायदेशीर सल्लागारांचे आभार मानले. त्याने असेही म्हटले की त्याच्या कुटुंब आणि मित्रांशिवाय तो यातून बाहेर पडू शकला नसता. रबाडाने अशी आशा व्यक्त केली की ही चूक त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारी नसेल आणि तो पुढे जाण्यासाठी आधीपेक्षा जास्त मेहनत करेल.