मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्ड याने एक विक्रम केला. मुंबईसाठी अनेक खेळाडू खेळले. त्यात सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. पण या दिग्गजांना जे शक्य झालं नाही ते पोलार्डने करून दाखवलं.

कायरन पोलार्डने कोलकाता नाईट रायडर्स विरोधात खेळत असलेल्या सामन्यात १५०व्यांदा मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले. मुंबईच्या संघाकडून १५० सामने खेळणारा पोलार्ड हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. २०१० साली १० मे ला पोलार्डने मुंबई इंडियन्स संघातून IPL मध्ये पदार्पण केले. चॅम्पियन्स लीग टी २० स्पर्धेत पोलार्डने त्रिनिदाद आणि तोबॅगो संघाकडून खेळताना उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली होती. त्यानंतर त्याला मुंबईने संघात स्थान दिले होते.

पोलार्डची IPL कारकीर्द (IPL 2019पर्यंत)

पोलार्डने IPL मध्ये २०१० ते २०१९ दरम्यान एकूण १४८ सामन्यात मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने २८.६९ च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत २ हजार ७५५ धावा केल्या आहेत. १८१ चौकार आणि १७६ षटकारांच्या सहाय्याने त्याने ही कामगिरी केली आहे. पोलार्डला अद्याप IPL मध्ये शतक झळकावता आलेले नाही, पण त्याने १४ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या ८३ आहे. गोलंदाजीतही त्याच्या नावावर ५६ बळी आहेत. मात्र गेली दोन वर्षे त्याने मुंबईकडून गोलंदाजी केलेली नाही.