राजस्थानविरूद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाने २० षटकात १९०चा आकडा पार केला. सूर्यकुमार यादवने ठोकलेल्या नाबाद ७९ धावांच्या बळावर मुंबईच्या संघाने ४ बाद १९३ धावांपर्यंत मजल मारली आणि राजस्थानच्या संघाला १९४ धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाची सुरूवात खूपच खराब झाली. यशस्वी जैस्वाल, कर्णधार स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन आणि महिपाल लोमरोर हे चौघेही स्वस्तात बाद झाले. जोस बटलरने मात्र एकाकी झुंज दिली. त्याने ७० धावांची दमदार खेळी केली, पण त्याच्या खेळीपेक्षाही त्याची विकेट अधिक चर्चेचा विषय ठरली.
१३व्या षटकात जेम्स पॅटिन्सन गोलंदाजी करत होता. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जोस बटलरने अतिशय महत्त्वाकांक्षी फटका खेळला. चेंडू जवळपास षटकार जाणार असं साऱ्यांनाच वाटत होतं पण त्याच वेळी कायरन पोलार्डने जादू केल्यासारखा तो झेल टिपला. चेंडू सीमारेषेच्या जवळ आलेला असताना पोलार्डने हवेत झेप घेतली आणि चेंडू आत ढकलला. त्याने ढकललेला चेंडू पाहता झेल सुटतो की काय असा साऱ्यांचा अंदाज होता, पण पोलार्ड अतिशय सुरेख पद्धतीने तो झेल टिपला आणि बटलरला तंबूचा रस्ता दाखवला.
पाहा तो अप्रतिम झेल-
त्याआधी, रोहित शर्मा – क्विंटन डी कॉक जोडीने तुफान फटकेबाजी करत चांगली सुरूवात केली होती, पण पदार्पणाचा सामना खेळणारा कार्तिक त्यागी याने IPLच्या पहिल्याच षटकात डी कॉकला बाद केलं. डी कॉकने १५ चेंडूत २३ धावा केल्या. सूर्यकुमार यादवसोबत रोहितने चांगली भागीदारी केली. पण श्रेयस गोपालने रोहितला मोठा फटका मारण्यास भाग पाडले आणि तो झेलबाद झाला. रोहितने २३ चेंडूत २ चौकार व ३ षटकारांसह ३५ धावा केल्या. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर इशान किशन पहिल्या चेंडूवर बाद झाला. श्रेयस गोपालने २ चेंडूत २ बळी टिपले. ३ गडी झटपट बाद झाल्याने कृणाल पांड्याला लवकर फलंदाजीस पाठवण्यात आले पण तो १७ चेंडूत १२ धावा करून माघारी परतला. एकीकडे गडी बाद होताना सूर्यकुमार यादवने मात्र एक बाजू लावून धरत झुंजार अर्धशतक ठोकलं. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या या जोडीने शेवटपर्यंत तळ ठोकत मुंबईला १९३ धावांपर्यंत मजल मारून दिली.