Kolkata Knight Riders vs Gujarat Titans Match Highlights: होम ग्राऊंडवर कोलकाता नाईट रायडर्स संघाला आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला आहे. गतविजेता संघ या हंगामात संघर्ष करताना दिसून आला आहे. ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात फलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीनंतर गुजरातच्या गोलंदाजांचाही सुपर हिट शो पाहायला मिळाला. या शानदार कामगिरीच्या बळावर गुजरात टायटन्सने या सामन्यात ३९ धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. ईडन गार्डन्सवर सामना जिंकायचा म्हणजे, २०० धावा करणं खूप गरजेचं आहे. कारण है मैदान फार मोठं नाही आणि आऊटफिल्ड जरा जास्तच फास्ट आहे. त्यामुळे धावा करणं सोपं जातं. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातसमोर पहिल्या डावात २०० धावांचा पल्ला गाठणं महत्वाचं होतं. गुजरातला पहिल्या डावात १९८ धावांपर्यंत मजल मारता आली.

कोलकाता नाईट रायडर्सला हा सामना जिंकण्यासाठी १९९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार अजिंक्य रहाणेची खेळी वगळली, तर इतर कुठलाही फलंदाज हवी तशी कामगिरी करू शकला नाही. अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली. सलामीला फलंदाजीला आलेला रहमानुल्लाह गुरबाज १ तर सुनील नरेन १७ धावा करत माघारी परतला. शेवटी रिंकू सिंगने जोर लावला, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कुठेतरी फसला. कारण कोलकाता नाईट रायडर्सचे गोलंदाज विकेट्स घेण्यात अपयशी ठरले. गुजरात टायटन्स संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शनची जोडी मैदानावर आली. या दोघांनी पहिल्या षटकापासून कोलकाताच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोन्ही फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत पहिल्या विकेटसाठी ११४ धावा जोडल्या. दोन्ही बाजूंनी कोलकाताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई होत होती. साई सुदर्शनने ३६ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ५२ धावांची खेळी केली. यादरम्यान त्या ने १४४.४४ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. तर शुबमन गिलने ५५ चेंडूंचा सामना करत १० चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ९० धावांची खेळी केली. रिंकू सिंगने घेतलेल्या शानदार झेलमुळे गिलचं शतक अवघ्या १० धावांनी हुकलं. शेवटच्या षटकांमध्ये जोस बटलरने तुफान फटकेबाजी केली. त्याने २३ चेंडूंचा सामना करत ४१ धावांची खेळी केली. गुजरातकडे २०० धावांचा पल्ला गाठण्याची संधी होती. मात्र, गुजरातला २० षटकअखेर ३ गडी बाद १९८ धावांपर्यंत मजल मारता आली. कोलकाताकडून गोलंदाजी करताना वैभव अरोरा, हर्षित राणा आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.