आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील १४ सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात मुंबईचा पराभव झाला असून कोलकाताचा पाच गडी राखून विजय झाला आहे. या विजयासाठी श्रेयस अय्यर आणि पॅट कमिन्स यांनी दिमाखदार खेळ करत विजय अक्षरश: खेचून आणला. पॅट कमिन्सने तर या डावात १५ चेंडूंमध्ये तब्बल ५६ धावा करुन नवा विक्रम रचला आहे. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान आणि कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठऱला आहे. त्याच्या या कामगिरीला पाहून मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा यानेदेखील आश्चर्य व्यक्त केलंय.

हेही वाचा >>>> पॅट कमिन्स, श्रेयस अय्यर यांनी करुन दाखवलं, कोलकाताचा मुंबईवर ५ गडी राखून दणदणीत विजय

मुंबईने दिलेले १६२ धावांचे लक्ष्य गाठताना कोलकाता संघ अडचणीत सापडला होता. कोलकाताची १०१ धावा पाच गडी बाद अशी स्थिती झाली होती. मात्र रसेल बाद झाल्यानंतर आलेल्या पॅट कमिन्सने पूर्ण सामनाच फिरवून टाकला. मैदावर येताच त्याने चौकार आणि षटकार यांचा अक्षरश: पाऊस पाडला. त्याने अवघ्या १५ चेंडूंमध्ये तब्बल ५६ धावा करून कोलकाताला विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीमुळे कोलकाता संघाने मुंबईवर पाच गडी आणि तीन षटके राखून दणदणीत विजय मिळवला. या धमाकेदार फलंदाजीनंतर पॅट कमिन्सच्या नावावर अनोख्या विक्रमांची नोंद झाली आहे.

हेही वाचा >>>> यष्टीरक्षक सॅम बिलिंग्सचा वायुवेग पाहून मुंबईचे खेळाडू अवाक्, देवाल्ड ब्रेविसला नेमकं कसं बाद केलं ?

पॅट कमिन्सने फक्त १५ चेंडूमध्ये तब्बल ५६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने सहा षटकार आणि चार चौकार लगावले आहेत. त्याच्या या खेळामुळे काही क्षणात सामना कोलकाताच्या बाजूने फिरला. त्याच्या या खेळानंतर तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त वेगाने अर्धशतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर केएल राहुल असून त्याने दिल्ली कॅपिटल्सविरोधात खेळत असताना १४ चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते.