आयपीएलच्या पंधराव्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल धमाकेदार फलंदाजी करताना दिसत आहे. काल(रविवार) मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्याने धडाकेबाज फलंदाजी करत शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या बळावर लखनऊ सुपर जायंट्सने मुंबईसमोर १६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र मुंबईचा संघ फक्त १३२ धावा करु शकला आणइ लखनऊ सुपर जायंट्सचा विजय झाला. या सामन्यातील शतकी खेळीमुळे केएल राहुलच्या नावावर एका विक्रमाची देखील नोंद झाली आहे.

कारण, राहुलचे आयपीएलमधील मुंबई इंडियन्सविरुद्ध फलंदाजीतील हे तिसरे शतक आहे. काल तो ६२ चेंडूत १०३ धावा करून नाबाद राहिला. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ४ षटकार मारले.

एकाच संघाविरुद्ध तीन टी-20 शतके झळकावणारा ठरला पहिला खेळाडू –

राहुलचे हे आयपीएलमधील चौथे शतक आहे. मात्र या चार शतकांपैकी तीन शतके हे त्याने मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध ठोकली आहेत. त्यामुळे तो T20 क्रिकेट इतिहासात कोणत्याही एका संघाविरुद्ध तीन शतके झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

२०१९ साली मुंबई विरुद्ध पंजाब किंग्जकडून खेळताना राहुलने वानखेडेवर ६४ चेंडूत १०० धावा केल्या होत्या व तो नाबाद होता. त्यानंतर त्याने सध्याच्या हंगामात ब्रेबॉर्न स्टेडियमवर ६० चेंडूत नाबाद १०३ धावांची खेळी केली आणि काल (रविवार) वानखेडे स्टेडियमवर ६२ चेंडूत १०३ धावा करून तो नाबाद राहिला. आयपीएलच्या इतिहासात केएल राहुलने चार शतके झळकावली आहेत आणि चारही वेळा तो नाबाद राहिला आहे. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू आहे.

मुंबईविरुद्ध राहुलची नेहमीच जोरदार फलंदाजी –

मुंबई इंडियन्स विरुद्ध केएल राहुलची फलंदाजी नेहमीच जबरदस्त राहिलेली आहे. काल मुंबई विरुद्ध आयपीएलमध्‍ये आपली १६वी इनिंग खेळताना केएल राहुलने तिसऱ्यांदा शतक झळकावले आहे. याशिवाय त्याने मुंबईविरुद्ध पाच अर्धशतकेही झळकावली आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्ध राहुलने १६ डावांत ८६.७ च्या सरासरीने एकूण ८६७ धावा केल्या आहेत.

मुंबईविरुद्ध सर्वाधिक अर्धशतके –

केएल राहुलने रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध ३७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यामुळे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक अर्धशतक करणारा तो खेळाडू ठरला. या सामन्यापूर्वी हा विक्रम सुरेश रैना आणि केएल राहुल यां दोघांच्या नावावर होता, या दोघांनी मुंबई इंडियन्सविरुद्ध ७-७ अर्धशतके झळकावली होती. पण राहुलने काल मुंबईविरुद्ध आठव्यांदा अर्धशतक झळकावून रैनाला मागे टाकले.