आयपीएलच्या १५ व्या हंगामाला येत्या २६ मार्चपासून सुरुवात होणार असून सर्वच संघांनी ट्रॅफीवर नाव कोरण्यासाठी कंबर कसली आहे. मयंक अग्रवाल कर्णधार असलेल्या पंजाब किंग्ज संघानेदेखील पुरेशी तयारी केली आहे. यावेळी काहीही झालं तरी ट्रॉफी जिंकायचीच असा प्रण या संघाने केला आहे. पंजाब येत्या २७ मार्च रोजी बंगळुरु संघाशी दोन हात करणार आहे.
शिखर धवन, बेअरस्टो ठरणार ब्रँड खेळाडू
पंजाब किंग्ज फ्रेंचायजीने संघ निवडताना यावेळी खूप काळजी घेतली आहे. फलंदाज तसेच गोलंदाज यांचा संघात समतोल असावा तसेच कोणत्याही बाजूने संघ कमकूवत राहू नये, यासाठी संघाने खूप विचारपूर्वक खेळाडूंची निवड केली आहे. संघाने यावेळी फक्त दोन खेळाडूंना रिटेन केलेले आहे. त्यामुळे पंजाबच्या ताफ्यात शिखर धवनसारखा मोठे फटके मारणारा फलंदाज आला आहे. शिखर धवन तसेच जॉनी बेअरस्टो ही जोडी पंजाबकडून सलामीची जोडी म्हणून मैदानात उतरु शकते. तसेच फलंदाजीमध्ये या जोडीव्यतिरिक्त पंजाबकडे यष्टीरक्षक मयंक अग्रवाल हा तिसऱ्या क्रमांवर फलंदाजीसाठी येऊन संघाला सावरु शकतो. संघासाठी ही जमेची बाजू असणार आहे.
यावेळी पंजाबकडून दिग्गज फलंदाज
याआधी शिखर धवनने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना धडाकेबाज कामगिरी करुन दाखवलेली आहे. तर दुसरीकडे हैदराबादकडून खेळताना बेअरस्टोने आपलं कर्तृत्व सिद्ध करुन दाखवलेलं आहे. त्यामुळे ही जोडी संघासाठी फार मोठा आधार ठऱणार असून या दोन खेळाडूंच्या जोरावर हा संघ मोठी धावसंख्या उभी करु शकतो. तर के. एल. राहुलने पंजाब संघ सोडलेला आहे. मात्र त्याची कमी मयंक अग्रवाल भरून काढू शकतो. तसेच लियाम लिव्हिंगस्टोन, कागिसो रबाडा तसेच शाहरुख खान सारखे फलंदाजही यावेळी पंजाबकडे असणार आहेत.
गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर पंजाबने हर्षदीपला रिटेन केलेले आहे. गोलंदाजीमध्ये हर्षदीपसोबत रबाडा आणि चहर ही जोडी असणार आहे. चहरने यावेळी चांगली कामगिरी करुन दाखवली नाही, तर त्याचे नुकसान पंजाबला होऊ शकते. त्यामुळे पंजाबला यावेळी गोलंदाजीकडे जास्त लक्ष द्यावं लागेल.
दरम्यान, अजूनही पंजाबने आतापर्यंत एकदाही जेतेपदाला गवसणी घातलेली नाही. त्यामुळे बाद फेरीपर्यंत मजल मारून फायनलमध्ये पोहचण्यासाठी या संघाला चांगली मेहनत करावी लागणार आहे.
पंजाब किंग्जचा पूर्ण संघ:
मयंक अग्रवाल, शिखर धवन, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, ऋषी धवन, वैभव अरोरा, ना. एलिस, अथर्व तायडे, बेनी हॉवेल, अर्शदीप सिंग</p>
पंजाब किंग्जचा संभाव्य बेस्ट प्लेइंग इलेव्हन
मयंक अग्रवाल, शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, कागिसो रबाडा, राहुल चहर, लियाम लिव्हिंगस्टोन, अर्शदीप सिंग, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, हरप्रीत ब्रार, राज अंगद बावा