Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders IPL Match Updates : आयपीएल २०२३ चा ३६ वा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगतदार सामना झाला. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी करून २० षटकात ५ विकेट्स गमावत २०० धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र, या धावांचा पाठलाग करणाऱ्या आरसीबीची कोलकाताच्या गोलंदाजांनी पुरती दमछाक केली.
फाप डु प्लेसिसनंतर शाहबाझ अहमद, ग्लेन मॅक्सवेल स्वस्तात माघारी परतला आणि आरसीबीची धावसंख्या मंदावली. त्यानंतर विराट कोहलीनं अर्धशतकी खेळी करून आरसीबीच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र, आंद्रे रसलच्या गोलंदाजीवर व्येंकटेश अय्यरने विराटचा अप्रतिम झेल पकडला आणि आरसीबीला मोठा धक्का बसला. त्यामुळे आरसीबीने २० षटकात ८ विकेट्स गमावत १७९ धावा केल्या आणि आरसीबीचा या सामन्यात पराभव झाला.
आरसीबीचे सलामीचे फलंदाज विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने चौफेर फटकेबाजी करत सुरुवातीच्या षटकांमध्ये धावांचा पाऊस पाडला होता. परंतु, सुयश शर्माच्या गोलंदाजीवर डु प्लेसिस १७ धावांवर असताना झेलबाद झाला आणि आरसीबीला मोठा धक्का बसला. त्यानंतर विराट कोहलीने कोलकाताच्या गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतकी खेळी केली. विराटने ३३ चेंडूत सहा चौकारांच्या मदतीनं ५१ धावांची खेळी केली. शाहबाज अहमद आणि ग्लेन मॅक्सवेल स्वस्तात माघारी परतल्याने आरसीबी दबावाच्या छायेत आली.
माहिपाल लोमरोरने १८ चेंडूत ३४ धावांची खेळी साकारली. परंतु, वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर माहिपाल झेलबाद झाला आणि आरसीबीच्या विजयाची आशा मावळली. दिनेश कार्तिकही वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर २२ धावांवर बाद झाला. कोलकातासाठी सुयश शर्मा आणि आंद्रे रसलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर वरुण चक्रवर्तीने चार षटकांत २७ धावा देत ३ विकेट घेण्याची चमकदार कामगिरी केली.