Krishnamachari Srikanth Suggests Rohit Change His Name: आयपीएल २०२३ चा ४९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये चेन्नईने दणदणीत विजय नोंदवला. या आयपीएलमध्ये मुंबईची अवस्था खूपच वाईट आहे. रोहित शर्माही खराब फॉर्मशी झगडत आहे. आयपीएल २०२३ मध्ये रोहित शर्माची बॅट फक्त एका सामन्यात तळपली होती. त्यानंतर इतर सामन्यात त्याची बॅट थंडावली. चेन्नईविरुद्धच्या सामन्यातही रोहित शून्यावर बाद झाला. रोहितच्या या खराब फॉर्ममुळे माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांतने टीका करताना त्याला नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे.
रोहित शर्माच्या खराब कामगिरीवर भारताचा माजी खेळाडू कृष्णमाचारी श्रीकांतचा राग उफाळून आला आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत म्हणाला की, “रोहित शर्माने त्याचे नाव बदलून ‘नो हिट’ शर्मा असे ठेवावे. यासोबतच त्याने रोहित शर्माला संघात संधी देऊ नये असेही म्हटले आहे.” श्रीकांत पुढे म्हणाला, मी जर मुंबईचा कर्णधार असतो तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नसती.
रोहित शर्माचा फॉर्म मुंबई इंडियन्ससाठी चिंतेचा विषय बनला आहे. यासोबतच त्याने आयपीएलमध्ये एक लाजिरवाणा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. खरं तर, तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेला खेळाडू बनला आहे. या स्पर्धेत तो १६ वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्याने दिनेश कार्तिकलाही मागे टाकले आहे, तो १५ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
हेही वाचा – IPL 2023: विराट कोहलीशी भिडणाऱ्या नवीन-उल-हकच्या ‘या’ पोस्टमुळे पुन्हा उडाली खळबळ, गंभीरनेही केली कमेंट
रोहितला सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाला आहे –
रोहित शर्मा आयपीएलमधील २३७ सामन्यांमध्ये आतापर्यंत १६ वेळा शून्यावर आऊट झाला आहे. यापूर्वी सर्वाधिक शून्यावर बाद होण्याच्या बाबतीत तो पाचव्या क्रमांकावर होता. पण आता तो या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. रोहितनंतर सुनील नरेन, मनदीप सिंग, दिनेश कार्तिक आणि अंबाती रायडू या खेळाडूंचे नाव आहे.
हेही वाचा – RCB vs DC: दिल्ली-बंगळुरु सामन्यानंतर विराट कोहली आणि सौरव गांगुली पुन्हा आले आमनेसामने, पाहा VIDEO
१० सामन्यात १८४ धावा केल्या आहेत –
रोहित शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने केवळ १८४ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी १८ च्या आसपास आहे. रोहितने केवळ एका सामन्यात ६५ धावांची खेळी केली होती. ती खेळी त्याने दिल्लीच्या विरोधात खेळली होती. फलंदाजी करताना तो दोनदा शून्यावर बाद झाला आहे.