आतापर्यंत सहा सामन्यांमध्ये माजी विजेत्या मुंबई इंडियन्सला फक्त एकच विजय मिळवता आला आहे. बऱ्याच दिवसांनी त्यांना आपल्या घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार असून, ही ‘घरवापसी’ त्यांना फळणार का, हाच प्रश्न त्यांच्या चाहत्यांच्या मनात असेल. शनिवारी मुंबईचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार असून या सामन्यात विजय मिळवल्यास त्यांना स्पर्धेतील आव्हान टिकवण्याच्या दृष्टीने सकारात्मक ठरू शकते.
मुबंईच्या एकाही खेळाडूला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. कर्णधार रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू, लेंडल सिमन्स, पार्थिव पटेल यांच्यापैकी एकाही फलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगादेखील छाप पाडू शकलेला नाही. हरभजन सिंगने काही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. आर. विनय कुमार आणि पवन सुयल यांना भेदक मारा करता आला नसून जसप्रीत बुमराहला या सामन्यात संधी मिळू शकते.
कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि सलामीवीर शिखर धवन यांच्या दमदार सलामीने संघाला विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे हैदराबादला या दोघांकडून चांगली सलामी मिळाल्यास त्यांचा विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो. डेल स्टेन आणि ट्रेंट बोल्टसारख्या नावाजलेल्या गोलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी होताना दिसत नाही, पण प्रवीण कुमार आणि भुवनेश्वर कुमार यांनी मात्र अचूक मारा करत संघाला यश मिळवून दिले आहे.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), कोरे अँडरसन, एडन ब्लिझार्ड, जसप्रीत बुमराह, उन्मुक्त चंद, र्मचट डि लॉन्ज, आरोन फिंच, श्रेयस गोपाळ, हरभजन सिंग, जोश हेझलवूड, सिद्धेश लाड, मिचेल मॅक्लेघान, लसिथ मलिंगा, अभिमन्यू मिथुन, प्रग्यान ओझा, हार्दिक पंडय़ा, पार्थिव पटेल, कीरेन पोलार्ड, नितीश राणा, अंबाती रायुडू, लेंडल सिमन्स, जगदीश सुचित, पवन सुन्याल, आदित्य तरे, विनय कुमार, अक्षय वाखरे.
सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, आशीष रेड्डी, रिकी भुई, रवी बोपारा, इऑन मॉर्गन, ट्रेंट बोल्ट, मॉइझेस हेन्रिके, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, प्रवीण कुमार, चामा मिलिंद, नमन ओझा, परवेझ रसूल, केव्हिन पीटरसन, पद्मनाभन प्रशांत, लोकेश राहुल, इशांत शर्मा, करण शर्मा, लक्ष्मीरतन शुक्ला, डेल
स्टेन, हनुमा विहारी, केन विल्यमसन.
सामन्याची वेळ : दुपारी. ४.०० वा. पासून.
थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स, सोनी सिक्स वाहिनीवर.