करोनाच्या संकटावर मात करून अखेर IPL 2020 स्पर्धेची सुरूवात झाली. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने मुंबई इंडियन्सला ५ गडी राखून शेवटच्या षटकात पराभूत केले. सौरभ तिवारीच्या ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने चेन्नईला १६३ धावांचे आव्हान दिले होते. अंबाती रायुडू (७१) आणि फाफ डु प्लेसिस (नाबाद ५८) या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने ते आव्हान शेवटच्या षटकात पूर्ण केले. या सामन्यानंतर केलेल्या भाषणात धोनीने रैनाला शालीजोडीतून टोला लगावला असल्याची चर्चा आहे.

करोना काळातही युएई क्रिकेट बोर्डाने उत्तम सोयीसुविधांनी युक्त अशी IPLची सोय केल्याबद्दलचा धोनीला प्रश्न विचारला. त्यावर बोलताना धोनी म्हणाला, “पडद्यामागे अनेक लोक सर्व गोष्टी सुरळीत पार पाडण्यासाठी झटत असतात. एक स्पर्धा नीट खेळता यावी यासाठी शेकडो लोक काम करत आहेत. पण काही वेळा क्रिकेटर्स या साऱ्याचा विचार न करता लगेच तक्रारी करण्यास सुरूवात करतात. खरं तर अशा प्रकारच्या सुविधा, ICCच्या अकादमीमध्ये रात्रीच्या वेळी लाईट्स लावून आम्हाला सराव करण्याची दिलेली परवानगी हे सारं खूप कौतुकास्पद आहे. कारण सराव करायला मिळाला नाही, तर तुम्ही स्पर्धेत चांगली कामगिरी करूच शकणार नाही”, असे धोनी म्हणाला.

सुरेश रैनाने स्पर्धेतून माघार घेण्याच्या मागे त्याच्यात आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यात झालेला वाद कारणीभूत असल्याचे वृत्त आऊटलूकने दिले होते. स्पर्धेच्या संपूर्ण कालावधीत IPL बायो-बबलमध्ये राहणे रैनाला थोडे भीतीदायक वाटत होते. त्याला धोनीला देण्यात आलेली किंवा त्याच्या रूमसारखीच बाल्कनीवाली रूम वास्तव्यास हवी होती. धोनीने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने कोणाचेही ऐकले नाही आणि थेट स्पर्धेतून माघार घेतली, अशी चर्चा रंगली होती. रैनाने या अफवा असल्याचं सांगितलं असलं तरी धोनीच्या भाषणातील क्रिकेटर्सच्या तक्रारींचा मुद्दा या रैनालाच टोला असल्याची चर्चा आहे.