Virat Kohli Reaction After RCB Victory: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने करून दाखवलं आहे. जगातील सर्वात मोठा चाहतावर्ग असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.या स्पर्धेतील क्वालिफायर १ चा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी पंजाबला अवघ्या १०१ धावांवर ऑलआऊट केलं. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एकतर्फी विजयाची नोंद केली. या विजयानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे.रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने साखळी फेरीतील सामन्यांमध्ये १४ पैकी ९ सामने जिंकून गुणतालिकेत दुसरं स्थान गाठलं.या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. हा रेकॉर्ड पाहता,रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ विजयापासून केवळ १ पाऊल दूर आहे.

विराट कोहलीचा तो इशारा, अनुष्का शर्माची रिअॅक्शन व्हायरल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयानंतर विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयात विराट कोहलीचाही मोलाचा वाटा आहे. पंजाब किंग्जविरूद्ध झालेल्या सामन्यात आव्हान छोटं होतं, पण संघाला वादळी सुरूवातीची गरज होती. विराटने २ चौकार खेचत १२ धावा केल्या. त्यानंतर तो बाद होऊन माघारी परतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून फिल सॉल्टने नाबाद ५६ धावांची खेळी करत संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला. या विजयानंतर विराट कोहलीचा जल्लोष पाहण्यासारखा होता. त्याने मैदानात येऊन स्टँडमध्ये असलेल्या अनुष्का शर्माकडे पाहिलं आणि केवळ १ सामना शिल्लक असा इशारा केला. अनुष्का शर्मानेही टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दमदार विजय

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील गोलंदाजांनी प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाब किंग्जच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक धक्के दिले. सलामीचे फलंदाज प्रियांश आर्या ७ तर प्रभसिमरन सिंग १८ धावांवर तंबूत परतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर जोस इंग्लिश ४, श्रेयस अय्यर २,नेहाल वढेरा ८, मार्कस स्टोइनिस २६, शशांक सिंग ३, मुशीर खान ०, अजमतु्ल्लाह उमरजई १८ आणि हरप्रीत ब्रार ४ धावांवर तंबूत परतला. पंजाब किंग्जचा संपूर्ण डाव अवघ्या १०१ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना फिल सॉल्टने ५६ धावांची खेळी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.