पीटीआय, मुंबई : यंदाची ‘आयपीएल’ गाजवणाऱ्या उमरान मलिक आणि मोहसिन खान या उदयोन्मुख तसेच शिखर धवन आणि दिनेश कार्तिक या अनुभवी खेळाडूंची भारतीय संघात निवड होण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९ जूनपासून सुरू होणाऱ्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी रविवारी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे.

गतवर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापासून भारतीय संघातून न खेळलेल्या अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने ‘आयपीएल’मधील कामगिरी, तंदुरुस्ती आणि नेतृत्व याआधारे पुनरागमनासाठी भक्कम दावेदारी केली आहे. ‘आयपीएल’मध्ये तो नियमित गोलंदाजी करीत आहे. याच कारणास्तव त्याला राष्ट्रीय संघातील स्थान टिकवता आले नव्हते.

सनरायजर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमरान मलिकने आपल्या भन्नाट वेगाने सर्वाचे लक्ष वेधले आहे, तर डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसिनकडे वेग आणि अचूकता हे गुण आहेत. पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अर्शदीप सिंग या आणखी एका वेगवान गोलंदाजाने ‘आयपीएल’मध्ये छाप पाडली आहे. हाणामारीच्या षटकांत प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात अर्शदीप वाकबदार आहे.

फलंदाजीतही अनेक नवे पर्याय निवडीसाठी उपलब्ध आहेत. तिलक वर्मानेही पहिल्यावहिल्या ‘आयपीएल’ मोसमात अपेक्षा उंचावल्या आहेत. वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांमध्ये दीपक हुडा आणि वेंकटेश अय्यर यांना मधल्या फळीत संधी मिळाली होती. विजयवीराच्या भूमिकेसाठी कार्तिकने कडवी दावेदारी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या विजयांत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कार्तिकने पुनरागमनासाठी पूरक कामगिरी केली आहे. गुजरातकडून खेळणाऱ्या राहुल तेवतियाकडेही सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता आहे. यजुर्वेद्र चहल आणि कुलदीप यादव या  गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी केली आहे.

धवन किंवा हार्दिककडे नेतृत्व?

१५ जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ रवाना होणार असल्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमरा यांना मायदेशातील मालिकेसाठी विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. हाच संघ जूनमध्ये आर्यलडमध्ये दोन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. त्यामुळे नेतृत्वाची जबाबदारी धवन किंवा हार्दिककडे सोपवली जाऊ शकते. धवनने गतवर्षी श्रीलंका दौऱ्यावर कर्णधारपद सांभाळले होते, तर हार्दिक गुजरात टायटन्सच्या पदार्पणीय हंगामात लक्षवेधी नेतृत्व करीत आहे.