Virat Kohli Naveen-ul-Haq Controversy in LSG vs RCB Match: आयपीएल २०२३ मध्ये सोमवारी आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील सामन्यात जे काही घडले, ते आयपीएलच्या इतिहासात लाजिरवाणे होते. १ मे रोजीच्या सामन्यात नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांच्यात सुरू झालेल्या लढतीचे रूपांतर अखेर विराट कोहली विरुद्ध गौतम गंभीर असे झाले. मैदानावर कोहली आणि गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली. काही जण विराटच्या समर्थनात आहेत, तर काही कालच्या गोंधळाबाबत नवीन-उल-हकच्या समर्थनात आहेत, पण दरम्यान पाकिस्तानी मीडियाने विराट कोहलीचे समर्थन करत नवीन-उल-हकला ‘भांडखोर’ म्हटले आहे.
किंबहुना कालच्या सामन्यात झालेल्या वादाची चर्चा पाकिस्तानी माध्यमांमध्येही होत आहे. पाकिस्तानी मीडियाने विराट कोहलीचे समर्थन करताना नवीन-उल-हकचे वर्णन ‘भांडखोर’ असे केले आहे. क्रिकेट पाकिस्तानच्या वेबसाइटने नवीन-उल-हकचे काही जुने व्हिडिओ देखील शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडू आणि श्रीलंकन खेळाडूंसोबत भांडताना दिसत आहे. नवीन-उल-हकचे पीएसएलमध्ये शाहिद आफ्रिदी आणि मोहम्मद आमिरसोबत भांडण झाले होते.
नवीनने पीएसएल आणि एलपीएलमध्येही घेतला आहे पंगा –
आयपीएल व्यतिरिक्त अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक पाकिस्तान सुपर लीग आणि लंका प्रीमियर लीगमध्येही खेळतो. लंका प्रीमियर लीगच्या २०२० आवृत्तीच्या सुरुवातीच्या सामन्यात नवीन-उल-हकची श्रीलंकेच्या थिसारा परेराशी वादावादी झाली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचवेळी पीएसएलच्या एका सामन्यात त्याचा मोहम्मद आमिर आणि शाहिद आफ्रिदीसोबत वाद झाला होता. आमिर आणि आफ्रिदीसोबतच्या त्याच्या बाचाबाचीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – LSG vs RCB: ‘तो एक छोटासा मुद्दा होता, जो…’; विराट-गौतम वादावर हरभजन सिंगचे ‘गंभीर’ वक्तव्य, पाहा VIDEO
कोणाला किती दंड ठोठावला?
विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक यांच्यातील जोरदार वादाची दखल घेत बीसीसीआयने दोघांना दंड ठोठावला आहे. बोर्डाने विराट कोहलीला १०० टक्के मॅच फी म्हणजेच १.०७ कोटी रुपये, गौतम गंभीरला १०० टक्के मॅच फी म्हणजेच २५ लाख रुपये आणि नवीन-उल-हकला ५० टक्के मॅच फी म्हणजेच १.७९ लाख रुपये दंड ठोठावला आहे. या तिघांनीही आयपीएल आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा मान्य केला आहे. त्यामुळे या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार नाही.