PBKS vs DC Highlights: आयपीएल २०२५ स्पर्धेतील ६६ वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जने २० षटकांअखेर ८ गडी बाद २०६ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना करूण नायरने महत्वपूर्ण खेळी केली. शेवटी ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिझवीने मिळून दिल्लीला विजय मिळवून दिला. दिल्लीच्या विजयामुळे पंजाब किंग्जच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.
पंजाबने उभारला २०६ धावांचा डोंगर
या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी आला. पंजाब किंग्जकडून प्रियांश आर्य आणि प्रभसिमनर सिंगची जोडी मैदानावर आली. या जोडीला हवी तशी सुरूवात करून देता आली नाही. प्रियांश आर्य अवघ्या ६ धावा करत माघारी परतला. तर प्रभसिमरन सिंगला २८ धावा करता आल्या. सलामी जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर जोस इंग्लिशने आकर्षक फटके मारले. त्याने ३ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ३२ धावांची खेळी केली. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरची बॅट या सामन्यातही तळपली.
त्याने ३४ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि २ षटकांराच्या साहाय्याने ५३ धावांची खेळी केली. अय्यरने मधळी फळी सांभाळून ठेवली. त्याला नेहाल वढेराची साथ मिळाली होती. मात्र, तो फार काळ टिकू शकला नाही. तो १६ धावांवर माघारी परतला. शेवटी मार्कस स्टोइनिसने मोठे फटके मारले. त्याने ३ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ४४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर पंजाब किंग्जने २० षटकांअखेर ८ गडी बाद २०६ धावांचा डोंगर उभारला.
दिल्ली कॅपिटल्सला हा सामना जिंकण्यासाठी २०७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या केएल राहुल आणि फाफ डू प्लेसिस या जोडीने अर्धशतकी सलामी दिली. दोघांनी मिळून ५५ धावा जोडल्या. केएल राहुलने ६ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ३५ धावांची खेळी केली. तर फाफ डू प्लेसिसने २३ धावांची खेळी केली. करुण नायरने एक बाजू धरून ठेवली होती. मात्र, तो ४४ धावांवर हरप्रीत ब्रारच्या चेंडूवर त्रिफळाचित होऊन माघारी परतला. सेट फलंदाज करूण नायर बाद झाल्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिझवीने मिळून महत्वपूर्ण धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
नंबर १ बनण्याची संधी हुकली
हा सामना पंजाब किंग्ज संघासाठी अतिशय महत्वाचा होता. कारण हा सामना जिंकून पंजाबकडे नंबर १ स्थानी पोहोचण्यची संधी होती. मात्र, पंजाबने हा महत्वाचा सामना गमावला आहे. पंजाबने आतापर्यंत १७ गुणांची कमाई केली आहे. हा सामना जिंकून पंजाबकडे १९ गुणांसह अव्वल स्थान गाठण्याची संधी होती. पंजाबच्या पराभवामुळे, आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स संघासाठी नंबर १ स्थानी जाण्याचं दार उघडलं आहे.