PBKS vs MI, IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेतील ६९ वा सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या दोन्ही संघांमध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही संघ टॉप २ मध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर १८४ धावांचा डोंगर उभारला. या सामन्यातही रोहित शर्माला हवी तशी सुरूवात करता आलेली नाही.
मुंबई इंडियन्सचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. मुंबईकडून रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनने डावाची सुरूवात केली. रोहित शर्मा आपला आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. संघाला ताबडतोड सुरूवात करून हा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. मात्र, गेल्या सामन्यात आणि या सामन्यातही त्याला हवी तशी सुरूवात करता आली नाही. त्याची संयमी खेळी पाहून, इयान बिशप यांनी मजेशीर कमेंट केल्याचे पाहायला मिळाले आहे.
काय म्हणाले इयान बिशप?
रोहित शर्मा फलंदाजी करत असताना, इयान बिशप इंग्लिश कॉमेन्ट्री पॅनलचा भाग होते. रोहित शर्मा या सामन्यात २१ चेंडूत २४ धावांची खेळी करत माघारी परतला. रोहितची खेळी पाहून इयान बिशप म्हणाले, “ मला वाटतंय, रोहित शर्मा हा गौतम गंभीर आणि शुबमन गिलला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे.” ही कमेंट त्यांनी हसत हसत केली. त्यांची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबईने उभारला १८४ धावांचा डोंगर
या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून सलामीला आलेल्या रायन रिकल्टन आणि रोहित शर्माने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून ४५ धावा जोडल्या. रायन रिकल्टनने २७ धावा केल्या. तर रोहित शर्माने २४ धावा केल्या.
मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. शेवटी हार्दिकने २६ तर नमन धीरने २० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर १८४ धावा केल्या. हा सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचणार आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा आहे.
pbks vs mi ipl 2025 I think rohit sharma trying to impress gautam gambhir and shubman gill said ian bishop in live match amd-2000