Rohit Sharma’s 250th match in IPL : आज आयपीएल २०२४ मधील ३३ वा सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना पंजाबच्या मुल्लानपूर या घरच्या मैदानावर होणार आहे. या हंगामात आतापर्यंत दोन्ही संघांना केवळ २-२ विजय मिळवता आले आहेत. गेल्या सामन्यात सीएसकेविरुद्ध रोहित शर्माने शानदार शतक झळकावले होते. आजचा सामना रोहितसाठी हा खास असणार आहे, या सामन्यात रोहित एक नवा विक्रम आपल्या नावावर करणार आहे.
रोहित शर्माला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी –
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आज आयपीएलमधील २५० वा सामना खेळणार आहे. यानंतर रोहित आयपीएलमध्ये २५० सामने खेळणारा दुसरा खेळाडू ठरेल. यापूर्वी हा पराक्रम चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनीने केला होता. आयपीएलमध्ये २५० हून अधिक सामने खेळणारा धोनी हा एकमेव खेळाडू आहे.
धोनी आतापर्यंत आयपीएलमध्ये २५६ सामने खेळले आहेत. या दोन्ही खेळाडूंनी आपापल्या कर्णधारपदाखाली ५-५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. आता एमएस धोनी सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळत आहे तर रोहित हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. रोहित शर्माने आतापर्यंत २४९ सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत तो आज पंजाबविरुद्धच्या २५०व्या आयपीएल सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले, तर तो या स्पर्धेत आतापर्यंत २४४ सामने खेळला आहे. कोहली अद्याप २५० सामन्यांच्या अंकापासून दूर आहे. अशा स्थितीत धोनीनंतर या विशेष आकड्याला स्पर्श करणारा रोहित शर्मा हा दुसरा खेळाडू ठरणार आहे.
हेही वाचा – IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीमुळे IPL मधून बाहेर
२००८ मध्ये म्हणजेच पहिल्या सत्रात आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या रोहित शर्माने आतापर्यंत २४९ सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या २४४ डावात फलंदाजी करताना त्याने ३०.१ च्या सरासरीने आणि १३१.२२ च्या स्ट्राईक रेटने ४९३२ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने २ शतके आणि ४२ अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने गोलंदाजीत १५ विकेट्स घेतल्या आहेत.
उल्लेखनीय आहे की, रोहित शर्मा आयपीएलमध्ये खेळणाऱ्या अशा खेळाडूंमध्ये सामील आहे, ज्याने गोलंदाजीत विकेट्सची हॅटट्रिक घेतली आहे आणि फलंदाजी करताना शतक झळकावले आहे. रोहित शर्मा आतापर्यंत डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. सध्या तो मुंबई इंडियन्सचा एक भाग आहे.