आयपीएल २०२५ दरम्यान पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील ५९व्या सामन्यादरम्यानचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पंजाब संघाची मालकिण आणि १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याचा आहे. या फोटोमध्ये प्रिती झिंटा वैभव सूर्यवंशीला मिठी मारत असल्याचा दिसत आहे. हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. यानंतर प्रिती झिंटा चांगलीच संतापली आहे.

वैभव सूर्यवंशी आणि तिचा हा फोटो व्हायरल होत असतानाच आता प्रिती झिंटाने नेटकऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. सोमवारी, जयपूरमध्ये सामन्यानंतर वैभव प्रिती झिंटाला भेटतानाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडिओमध्ये वैभव प्रितीशी गप्पा मारताना आणि नंतर त्याला मिठी मारताना दिसत आहे. असा दावा करण्यात आला होता की हा व्हिडिओ जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममधील आहे.

वैभवला मिठी मारतानाचा तिचा फोटो मीडियामध्ये चर्चेचा विषय बनताच, अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा फोटो खोटा असल्याचे सांगितले आहे. वैभव सूर्यवंशी आणि प्रिती झिंटाचा तो फोटो प्रत्यक्षात खरा नव्हताच. तो एक बनावट फोटो तयार करण्यात आला होता आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.

प्रिती झिंटाने एक्सवर पोस्ट करत हा फोटो फेक असल्याचे सांगितले, ती म्हणाली; हा एक बनावट फोटो असून ही बातमीही खोटी आहे. मला तर आश्चर्य वाटतंय की आता वृत्तवाहिन्या देखील मॉर्फ केलेले फोटो वापरत आहेत आणि बातम्याही करत आहेत”.

प्रीती झिंटाच्या या विधानामुळे, त्या फोटोच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला. १७ मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यानंतर पंजाब किंग्जची मालकीण प्रिती झिंटा वैभव सूर्यवंशीला भेटली. पण त्या भेटीदरम्यान दोघांनीही हस्तांदोलन केलं आणि गप्पा मारताना दिसले. राजस्थान रॉयल्स संघाच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवरही त्यांच्या भेटीचा व्हीडिओ शेअर करण्यात आला, त्यात प्रिती झिंटा वैभव सूर्यवंशीला मिठी मारताना दिसली नाही.