मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात राजस्थान रॉयल्सला ५७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सने विजयासाठी दिलेलं १९४ धावांचं आव्हान राजस्थानला पेलवलं नाही. ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि जेम्स पॅटिन्सन या त्रिकुटाच्या भेदक माऱ्यासमोर राजस्थानचा डाव कोलमडला. जोस बटलरचा अपवाद वगळता राजस्थानचा एकही फलंदाज मुंबईच्या माऱ्याचा सामना करु शकला नाही.

त्यातच राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सामनाधिकाऱ्यांनी याप्रकरणी पत्रक जाहीर करत स्मिथला सुनावण्यात आलेल्या शिक्षेबद्दल माहिती दिली. याआधीही आयपीएलच्या तेराव्या हंगामात RCB चा कर्णधार विराट कोहली, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरलाही षटकांची गती कायम न राखल्यामुळे १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.