चेन्नई सुपर किंग्सचा संघ यंदाच्या मोसमात आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. याशिवाय आयपीएलमध्ये १८ वर्षांमध्ये पहिल्यांदाच सीएसकेचा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानी राहिला आहे. यादरम्यान संघातील खेळाडूंचीही साधारण राहिली होती. तर लिलावात संघात सामील केलेले वरिष्ठ खेळाडूही आपल्या कामगिरीची छाप पाडू शकले नाहीत. आता अश्विनला चाहत्यांनी संघ सोडण्यास सांगितलं आहे. यावर त्याने प्रतिक्रिया दिली.

अलीकडेच एका चाहत्याने चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू खेळाडू आर. अश्विनला असे काही म्हटलं ज्याचा त्याने कधी विचारही केला नव्हता. चाहत्याने अश्विनला फ्रँचायझी सोडण्यास सांगितले. या हंगामात अश्विन फ्रँचायझीमध्ये परतला आणि मेगा लिलावात त्याला ९.७५ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले. पण अश्विनला ९ डावात फक्त ७ विकेट घेता आले.

अलिकडेच एका यूट्यूब लाईव्ह सेशनदरम्यान, जेव्हा एका चाहत्याने अश्विनला संघ सोडण्यास सांगितले तेव्हा अश्विननेही त्याचं प्रामाणिकपणे उत्तर दिलं. चाहता म्हणाला, “नमस्कार अश्विन, तुला खूप खूप प्रेम, कृपया माझी लाडकी चेन्नई फ्रँचायझी सोड.” चाहत्याने अशी कमेंट त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये केली होती.

अश्विन या कमेंटबाबत म्हणाला की, “एक गोष्ट मी समजू शकतो ती म्हणजे त्याचे फ्रँचायझीवरील प्रेम. फक्त तुम्ही हे जे बोलता ते स्वत:साठी बोलता याची खात्री करून बोलत जा. तुम्ही काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहात ते मला समजतंय. माझंही संघावर तेच प्रेम आहे. मी हा सीझन वाया जाऊ देणार आहे असे समजू नका. माझ्याकडे जे आहे ते माझ्या नियंत्रणात आहे. जर तुम्ही माझ्या हातात चेंडू दिला तर मी गोलंदाजी करेन, जर तुम्ही मला बॅट दिली तर मी फलंदाजी करेन.”

अश्विन पुढे म्हणाला की, “मी पॉवरप्लेमध्ये अपयशी ठरलो आणि मी खूप जास्त धावा दिल्या. पुढच्या हंगामात मला माझी चूक दुरुस्त करायची आहे. मी खूप मेहनत केली आहे आणि अशी अनेक एरिया आहेत ज्यावर मी काम करू शकतो. मी पॉवरप्लेमध्ये खूप जास्त धावा दिल्या आहेत. मला या चुकांवर पुढील वर्षीसाठी पर्याय शोधायचे आहेत. जास्तीत जास्त मी हेच करू शकतो.”

अश्विनचं चाहत्यांपेक्षाही त्याचं या फ्रँचायझीवर सर्वाधिक प्रेम आहे आणि यंदाच्या मोहिमेतील कामगिरीमुळे तो स्वत: निराश असल्याचे त्याने सांगितले. अश्विन सांगताना म्हणाला, “माझं या संघावर तुम्हा सर्वांपेक्षा जास्त प्रेम आहे. मी २००९ आणि २०१० मध्ये संघाबरोबर होतो. मी ७ वर्ष संघाकडून खेळलो आहे. मी चेन्नई संघाबरोबर असताना संघाने प्लेऑफसाठी क्वालिफाय केलंय आणि जेतेपदही जिंकलं आहे. त्यामुळे चॅम्पियन संघाची पहिल्यांदा अशी स्थिती पाहताना मलाही दु:ख होतंय. मलाही वाईट वाटतंय. म्हणूनच मी कोपऱ्यात बसून रडतोय आणि विचार करतोय की मी पुढे काय करू शकतो? हेच माझं लक्ष्य आहे”, असं शेवटी अश्विन म्हणाला.