आयपीएल २०२५ मध्ये प्लेऑफसाठी ठरलेल्या आरसीबी संघाने इतिहास घडवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी प्लेऑफच्या सामन्यापूर्वी मोठी आनंदाची बातमी आली आहे. संघाने १७ वर्षांच्या आयपीएल कामगिरीत असा टप्पा गाठला आहे, जो आजवर कोणत्याच संघाला जमलेला नाही.
पहिल्या आयपीएल जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेला आरसीबी सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचा पुढील लीग सामना उद्या म्हणजेच २७ मे रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आहे. आरसीबीचे लक्ष्य हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्यावर असेल, परंतु या सामन्यापूर्वीच त्यांनी सर्व संघांना मागे टाकलं आहे. चाहत्यांच्या बाबतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सर्व संघांना मागे टाकत नवा मुक्काम गाठला.
यंदाच्या मोसमात आरसीबीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या आरसीबी संघाचा चाहता वर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. सर्वच चाहत्यांना आरसीबीच्या पहिल्या आयपीएल ट्रॉफीची प्रतिक्षा आहे. यादरम्यानच इन्स्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांची संख्या २० मिलियन म्हणजेच २ कोटींवर पोहोचली आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांच्या बाबतीत आरसीबी सर्व संघांपेक्षा खूप पुढे आहेत. याचबरोबर सोशल मीडियावर २० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठणार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा पहिला संघ आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघ फॉलोअर्सच्य बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. ज्यांचे १८.६ मिलियन चाहते आहेत. या बाबतीत सर्वात कमी फॉलोअर्स लखनौ सुपर जायंट्स संघाचे आहेत. लखनौचे इन्स्टाग्रामवर फक्त ३.६ मिलियन चाहते आहेत.
आयपीएलच्या कोणत्या संघाचे इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स?
फॉलोअर्सच्या बाबतीत मुंबई इंडियन्स तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे इन्स्टाग्रामवर १८ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर चौथ्या स्थानावर असलेले कोलकाता नाईट रायडर्स ७.५ मिलियनसह या तिन्ही संघांपेक्षा खूपच मागे आहेत. यानंतर सनरायझर्स हैदराबादचे इन्स्टाग्रामवर ५.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. याशिवाय, राजस्थान रॉयल्सचे ५.२ मिलियन फॉलोअर्स आहेत, गुजरात टायटन्सचे ४.९ मिलियन फॉलोअर्स आहेत, दिल्ली कॅपिटल्सचे ४.६ मिलियन फॉलोअर्स आहेत आणि पंजाब किंग्जचे ४.१ मिलियन फॉलोअर्स आहेत.
आयपीएल २०२५ मधील आरसीबीची कामगिरी
पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या हंगामात शानदार कामगिरी केली आहे. आरसीबीने आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत, त्यापैकी ८ सामने जिंकले आहेत आणि ४ गमावले आहेत. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. १७ गुणांसह, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.