१८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं आयपीएल जेतेपदाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. जेतेपदापर्यंतच्या वाटचालीत खेळाडूंचा जेवढा वाटा आहे तेवढीच महत्त्वाची भूमिका सपोर्ट स्टाफची आहे. वर्षानुवर्ष जेतेपदाचे दावेदार म्हणवल्या जाणाऱ्या पण जेतेपदापासून दूर राहणाऱ्या आरसीबीला जेतेपद मिळवून देण्यासाठी सपोर्ट स्टाफने कसून मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीचं फळ मंगळवारी आरसीबीला मिळालं. झिम्बाब्वेचे माजी कर्णधार, सार्वकालीन महान फलंदाज आणि कोचिंग क्षेत्रातील जाणतं व्यक्तिमत्व अँडी फ्लॉवर आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक आहेत. ६३ टेस्ट, २१३ वनडे असा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. भारतात अफलातून अशी कामगिरी नावावर असणाऱ्या फ्लॉवर यांनी आरसीबीची विजयासाठीची बैठक तयार केली.

४०वर्षीय मो बोबट यांची आरसीबीने वर्षभरापूर्वी आरसीबीचे डिरेक्टर ऑफ क्रिकेट पदी नियुक्ती केली. आतापर्यंत आरसीबीने असंख्य माजी खेळाडूंना ताफ्यात प्रशिक्षक म्हणून समाविष्ट केलं होतं. बोबट यांच्याकडे तसा खेळण्याचा अनुभव नाही. त्यामुळे कोण हे बोबट याविषयी क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगल्या. आरसीबी संघाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी बोबट दशकभराहून जास्त काळ इंग्लंड पुरुष क्रिकेट संघाचे संचालक म्हणून कार्यरत होते. वयोगट तसंच डोमेस्टिक स्पर्धांच्या माध्यमातून प्रतिभावान खेळाडू हेरणं, त्यांना इंग्लंड संघाशी निगडीत प्रारुपात समाविष्ट करणं यामध्ये बोबट यांची भूमिका निर्णायक ठरली. २०१९ वनडे तसंच २०२२ टी२० वर्ल्डकपसाठी इंग्लंडला खेळाडूंची फळी उभी करुन देण्यात बोबट यांचा सिंहाचा वाटा होता. बॅझ अर्थात ब्रेंडन मॅक्युलम आणि बेन स्टोक्स यांच्याशी समन्वयातून बोबट यांनी इंग्लंडला चांगले खेळाडू मिळवून दिले. इंग्लंडच्या U19 संघाबरोबर काम करण्याचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे पहिले प्लेयर आयडेंटिफिकेशन लीड म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. आरसीबीचे पूर्ण वेळ संचालक म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी बोबट यांनी कन्सल्टंट म्हणून काम केलं होतं.

एखाद्या मोठ्या खेळाडूसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा सम्यक संघ बांधण्यावर बोबट-फ्लॉवर जोडीने भर दिला. टी२० प्रकारात जिंकायचं असेल तर गोलंदाजांची तगडी फौज उभी करणं आवश्यक आहे हे या दोघांनी हेरलं. याच दृष्टिकोनातून ते लिलावात उतरले. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणाऱ्या जोश हेझलवूडसाठी त्यांनी तिजोरी रिती केली. भुवनेश्वर कुमारची ताकद या दोघांनी हेरली आणि त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. डावखुरे वेगवान गोलंदाज परिणामकारक ठरतात हे लक्षात घेऊन त्यांनी यश दयाळला रिटेन करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार हा शांत, संयमी असला पाहिजे या विचारातून या जोडगोळीने आरसीबीच्या नेतृत्वाची धुरा रजत पाटीदारकडे सोपवली. दडपणाच्या क्षणीही परिपक्वतेचा प्रत्यय घडवत रजतने संघाच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं.

दिनेश कार्तिकला सपोर्ट स्टाफमध्ये घेण्याचा निर्णय आरसीबीसाठी गेमचेंजर ठरला. अगदी आतापर्यंत आरसीबी संघाचा भाग असलेल्या डीकेची खेळाबद्दलची निरीक्षणं अतिशय चपखल असतात. विकेटकीपर आणि फटकेबाजी या दोन्ही आघाड्यांवर जितेश शर्माला तयार करण्यात डीकेची भूमिका कळीची ठरली. विविध आयपीएल संघांकडून खेळण्याचा डीकेचा अनुभव आरसीबीसाठी फलदायी ठरला. कोलकाताच्या ताफ्यातून आरसीबीकडे आलेले ओंकार साळवी आरसीबीचा अविभाज्य भाग आहेत. मैदानाचा आकार, वातावरण, प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या शैलीचा अभ्यास करुन सापळे रचणे या सगळ्यात ओंकार यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

आरसीबीच्या कॅम्पमधलं आणखी एक लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे मानेकाका. रमेश माने आरबीसी संघाचे मसाजर म्हणून काम पाहतात. आयपीएल ही दमवणारी स्पर्धा आहे. दोन महिने सातत्याने खेळणं आणि प्रवास हे सांभाळणं अवघड आहे. मानेकाका थकलेल्या शरीरांना मसाजद्वारे संजीवनी प्राप्त करुन देतात. अनेक वर्ष टीम इंडियाचा भाग असलेले मानेकाका आरसीबीच्या महत्त्वपूर्ण शिलेदारांपैकी एक आहेत. त्यांच्या बरोबरीने रोहित सिंगही मसाज थेरपिस्ट म्हणून काम पाहतात. फ्रेडी विल्ड हे आरसीबीचे अॅनालिस्ट आहेत. प्रतिस्पर्धी संघाचे कच्चे दुवे हेरून डावपेच तयार करणे, आपल्या संघातील खेळाडूंच्या खेळातल्या त्रुटी दूर करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे ही अॅनालिस्टची कामं असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालोलन रंगराजन स्काऊटिंगचं काम करतात. देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय स्पर्धा पाहणं आणि चांगल्या खेळाडूंना टिपणं हे त्यांचं काम आहे. या खेळाडूंना ट्रायलसाठी बोलावणं, कोचेसशी समन्वय हे सगळं काम ते पाहतात. खेळाडूंना त्यांच्या शरीरानुसार फिटनेस वेळापत्रक ठरवणं हे काम ट्रेनर शंकर बसू पाहतात. रिचर्ड हलसाल असिस्टंट कोच आहेत तर इव्हान स्पीचली आणि जेम्स पाईप आरसीबीचे फिजिओ आहेत. आयपीएल संघांच्या ताफ्यातली एकमेव मुलगी म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झालेली नवनीता गौतम अॅथलेटिक थेरपिस्ट आहे. शिखा धौंडियाल टीम डॉक्टर आहेत. प्रचंड लोकप्रियता असलेल्या संघाचं जाणंयेणं, सुरक्षितता, साहित्य पाठवणं या सगळ्याची जबाबदारी मेजर शमिंदर सिंग सिधू हाताळतात. अरहिंत जैन संघाचं एकूण व्यवस्थापन बघतात.