RCB Players Emotional Video Viral : आयपीएल २०२३ च्या ७० व्या सामन्यात रविवारी गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला. शेवटच्या लीग सामन्यात पराभव झाल्याने आरसीबीचा यंदाच्या आयपीएलमधील प्रवास संपला आणि प्ले ऑफ मध्ये खेळण्याचं सर्व खेळाडूंच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. आरसीबीच्या खेळाडूंबाबत बोलायचं झालं तर, क्रिकेटवर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर त्यांची चर्चा करत आहे. या आयपीएल हंगामात आरसीबीने एकूण १४ सामने खेळले, यामध्ये त्यांचा ७ सामन्यांमध्ये विजय झाला, तर तितक्याच ७ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
परंतु, रविवारी गुजरात टायटन्सविरोधात झालेला पराभव आरसीबीच्या हृदयाला स्पर्श करून गेला. कारण सामना संपल्यानंतर आरसीबीचे सर्व खेळाडू भावनिक झाल्यानं चाहत्यांमध्ये कमालीची शांतता पसरली होती. आरसीबीच्या खेळाडूंचा मैदानात फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
आरसीबीने ७ सामने जिंकून १४ गुण मिळवल्याने गुणतालिकेत ते सहाव्या स्थानावर पोहोचले आणि आयपीएलमधील त्यांचा प्रवास इथेच थांबला. संघाच्या फलंदाजांबाबत बोलायचं झालं तर, कर्णधार फाफ डु प्लेसिसने १४ सामन्यांत सर्वात जास्त ७३० धावा केल्या. याचदरम्यान फाफचा बेस्ट स्कोअर ८४ इतका होता. त्याच्यासोबत सलामीचा फलंदाज विराट कोहलीनेही १४ सामन्यात ६३९ धावांची खेळी केली आणि विराटने या आयपीएलमध्ये दोन शतकही ठोकले.
आरसीबीने ५ विकेट्स गमावत १९७ धावा केल्या. तर गिलने अप्रतिम फलंदाजी करत पुन्हा एकदा शतकी खेळी केली. गिलने ५२ चेंडूत १०४ धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये ५ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश आहे. विराट कोहलीच्या सलग दुसऱ्या शतकावर गिलची विजयी शतकी खेळी सर्वांच्याच भुवया उंचावून गेली. गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केल्यानं आरसीबी आयपीएलमधून बाहेर झाली असून मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे.