आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आज चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघांमध्ये लढत होत आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे आजचा सामना कोण जिंकेल याकडे सर्वांचेच लक्ष्य लागले आहे. आजची लढत चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि बंगळुरुचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात असल्याचे म्हटले जात आहे. मात्र आजच्या सामन्याच्या सुरुवातीलाच बंगळुरु संघाची विशेष चर्चा होत आहे. या संघाच्या पूर्ण खेळाडूंनी दंडाला काळ्या रंगाची फीत बांधली आहे. बंगळुरुच्या खेळाडूंनी काळ्या रंगाची फीत का बांधली ? आजच्या बंगळुरु आणि चेन्नई यांच्यातील सामन्यामध्ये बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकत सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बंगळुरुचे सर्व खेळाडू मैदानात क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरले. मात्र यावेळी सर्वच खेळाडूंनी त्यांच्या दंडाला काळ्या फिती लावल्या. बंगळुरुचा दिग्गज गोलंदाज हर्षल पटेलच्या बहिणीचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे हर्षलला आयपीएलीचे सामने सोडून तातडीने घरी जावे लागले. अशा दु:खद क्षणी कुटुंबाला त्याची गरज असल्यामुळे तो बायोबबलमधून बाहेर पडलेला आहे. हर्षल पटेलच्या याच दु:खात सहभागी होण्यासाठी तसेच हर्षल पटेलच्या बहिणीला श्रद्धांजली म्हणून बंगळुरुच्या सर्व खेळाडूंनी दंडाला काळ्या फिती बांधल्या आहेत. बंगळुरुची चांगली सुरुवात दरम्यान, नाणेफेक जिंकून आरसीबीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरुला चौथ्याच षटकात ऋतुराज गायकवाडच्या रुपात पहिला बळी मिळाला आहे. तर मोईन आलीला बंगळुरुने अवघ्या तीन धावांत तंबुत पाठवलंय. दुसरीकडे चेन्नईने आतापर्यंत सलग चार सामने गमावले आहेत. त्यामुळे चेन्नई संघ हा सामना जिंकण्यासाठी पूर्ण ताकतीने लढत आहे