RCB vs PBKS, Rain Started In Ahmedabad: आयपीएल २०२५ स्पर्धेतील फायनलचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना ठरलेल्या वेळेनुसार, संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक संध्याकाळी ७ वाजता होईल. याआधी हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर होणार होता. मात्र, भारत- पाकिस्तानातील तणावाची स्थिती पाहता हे सामने अहमदाबादमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयपीएल २०२५ स्पर्धेतील क्वालिफायर १ चा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर क्वालिफायर २ सामन्यात पंजाब किंग्ज ने मुंबई इंडियन्सचा पराभव करत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. त्यामुळे पहिल्यांदाच दोन्ही संघ अंतिम फेरीत भिडणार आहेत.यावेळी आयपीएलला नवा विजेता संघ मिळणार आहे. मात्र, पावसामुळे सामन्यात व्यत्यय निर्माण होऊ शकतो.

गेल्या १८ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे चाहते आपल्या संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची स्वप्न पाहत होती. हे स्वप्न पूर्ण करण्यापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एक पाऊल दूर आहे. मात्र, पावसामुळे या विजयाचं गणित बिघडण्याची शक्यता आहे. अहमदाबादमध्ये सामन्याआधी ढगाळ वातावरण आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या चाहत्यांनी सामना सुरू होण्याच्या ४ ते ५ तासांआधीच स्टेडियमबाहेर तुफान गर्दी केली. संध्याकाळी चार, साडेचार दरम्यान पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे स्टेडियमबाहेर असलेल्या क्रिकेट चाहत्यांची चांगलीच पळापळ झाली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस

आयपीएल २०२५ स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नव्हता. मात्र, अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयकडून राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आज जर पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर हा सामना ४ जूनला खेळवला जाऊ शकतो. मात्र, हा सामना आजच्याच दिवशी खेळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. त्यासाठी सामना दोन ते अडीच तास उशिराने देखील सुरू केला जाऊ शकतो. याआधी क्लालिफायर २ चा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात देखील पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे हा सामना ९:४५ ला सुरू करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.