Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Highlights: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हा सामना जिंकण्यासाठी आतपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडून काढायचे होते. सनरायझर्स हैदराबादने पहिल्या डावात २३१ धावांचा डोंगर उभारला होता. आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने केवळ २ वेळेस २०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. २३२ धावांचा पाठलाग करणं म्हणजे डोंगर सर करण्यासारखंच होतं. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हवी तशी सुरूवात मिळाली, पण शेवट हवा तास करता आला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा सामना ४२ धावांनी गमवावा लागला आहे.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. हे आमंत्रण स्वीकारून हैदराबादने २० षटकांअखेर २३१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहली आणि फिल सॉल्ट ही सलामी जोडी मैदानात आली. दोघांनी मिळून पावरप्लेमध्ये हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ८० धावा जोडल्या. त्यानंतर विराट कोहली ४३ धावा करत माघारी परतला.
विराट बाद होऊन माघारी परतल्यानंतर फिल सॉल्टने दुसऱ्या हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवली. त्याने ६२ धावा चोपल्या. बंगळुरूच्या फलंदाजांनी जशी सुरूवात केली तसा शेवट करता आला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संंपूर्ण डाव १८९ धावांवर आटोपला आहे. यासह हा सामना सनरायझर्स हैदराबादने ४२ धावांनी आपल्या नावावर केला. या पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गुणतालिकेत टॉप २ मध्ये जाण्याचा मार्ग आणखी कठीण झाला आहे.
हैदराबादने उभारला २३१ धावांचा डोंगर
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. हैदराबादकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना ईशान किशनने सर्वाधिक ९४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि ५ षटकार खेचले. तर सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने ३४ धावांची खेळी केली. ट्रॅव्हीस हेडला या डावात १७ धावा करता आल्या. शेवटी अनिकेच वर्माने २६, हेनरिक क्सासेनने २४ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २३१ धावांपर्यंत पोहोचवली.