Rohit Sharma Birthday Celebration Video: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा आज ३० एप्रिल रोजी त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. रोहित शर्माला क्रिकेट जगतातील खेळाडूंनी वाढदिवसाच्या रोहितला शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित शर्मा सध्या आयपीएल २०२५ चे सामने खेळत असून त्याने संघाबरोबर वाढदिवस साजरा केला आहे. मुंबई इंडियन्स संघानेही रोहितच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हीडिओ शेअर केला आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ सध्या पुढील सामन्यासाठी जयपूरमध्ये आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना उद्या म्हणजेच १ मे रोजी राजस्थान रॉयल्स संघाविरूद्ध होणार आहे. दरम्यान रोहित शर्माचा वाढदिवस संघाबरोबर केक कापून साजरा करण्यात आला आहे. रोहित शर्माबरोबर त्याची पत्नी रितिका सजदेह आणि मुंबईच्या ताफ्यातील काही खेळाडूही आहेत.
रोहित शर्माच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हीडिओ जयपूरच्या हॉटेलेमधील आहे. रोहित शर्मा त्याच्या वाढदिवसाचा केक कापत आहे, त्याची पत्नी रितिका सजदेह त्याच्याबरोबर उभी आहे. रोहितच्या वाढदिवसाच्या केकवर त्याचे विविध फोटो आहेत. ज्यामध्ये टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतरचा क्षण, तो ट्रॉफी पकडलेला फोटो आणि मुंबई इंडियन्सच्या जर्सीमधीलही फोटो आहे. त्याचबरोबर केकवर ‘हॅपी बर्थडे हिटमॅन’ लिहिलं आहे. रोहितने केक कट केल्यानंतर पहिलं रितिका रोहितला केक भरवते आणि मग दोघेही एकमेकांना मिठी मारतात.
यानंतर रोहित शर्माच्या चेहऱ्याला सूर्यकुमार यादव केक लावताना दिसत आहे. तर तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट आणि कायरन पोलार्ड यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याला मिठी मारली. व्हीडिओच्या अखेरीस रोहित शर्माने हात जोडत सर्वांचे आभार मानले. मुंबई इंडियन्सने शेअर केलेला रोहितचा हा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२५ च्या सामन्यांदरम्यान मुंबई इंडियन्सला पाठिंबा देण्यासाठी रितिका तिच्या मुलांसह अनेक सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये दिसली आहे. सध्या संघ जयपूरमध्ये आहे, जिथे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघाला १ मे रोजी राजस्थान रॉयल्सशी सामना खेळायचा आहे.