IPL 2020 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा सहावा सामना मंगळवारी राजस्थानच्या संघाशी होणार आहे. आतापर्यंत मुंबईच्या संघाने पाचपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. गेल्या दोन्ही सामन्यात मुंबईच्या संघाने दमदार विजय मिळवला आहे. पांड्या-पोलार्ड जोडीने दमदार कामगिरी केल्यामुळे सध्या संघाचे मनोधैर्य उंचावले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेण्यासाठी मुंबईचा संघ उत्सुक आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला एक मोठा विक्रम खुणावतो आहे.

कर्णधार रोहित शर्माला यंदाच्या हंगामात म्हणावी तेवढी दमदार कामगिरी करता आलेली नाही. पण रोहितने यंदाच्या हंगामात ५ सामन्यांत दोन अर्धशतके ठोकली आहेत. आजच्या सामन्यातही रोहित शर्माकडून चाहत्यांच्या खूप अपेक्षा आहेत. सध्या रोहित शर्मा अर्धशतकांच्या बाबतीत सुरेश रैनाच्या बरोबरीत आहे. रोहितने राजस्थानविरूद्धच्या सामन्यात जर अर्धशतक ठोकलं तर IPL स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकं ठोकणारा भारतीय फलंदाज बनण्याचा मान रोहितला मिळेल. रोहितच्या नावावर सध्या ३८ अर्धशतके आहेत. तो सध्या यादीत रैनासोबत आहे.

रोहितने राजस्थानच्या संघाविरूद्ध अर्धशतक ठोकलं तर तो संपूर्ण यादीत दुसऱ्या स्थानी विराजमान होईल. या यादीत हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर अव्वल आहे. त्याने १३१ सामन्यांमध्ये सर्वाधिक ४५ अर्धशतके ठोकली आहे. दुसऱ्या स्थानी सध्या रोहित शर्मा आणि सुरेश रैना संयुक्तपणे आहेत. तर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन हे दोघे ३७ अर्धशतकांसह यादीत संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहेत.

राजस्थान विरूद्धच्या सामन्यात रोहितच्या नावावर आणखी एक विक्रम होणार आहे. राजस्थानविरूद्ध जेव्हा रोहित मैदानावर उतरेल तेव्हा तो IPL स्पर्धेत सर्वाधिक सामना खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रैनासोबत दुसऱ्या स्थानी पोहोचेल. सध्या रोहितच्या नावावर १९३ सामने तर रैनाच्या नावावर १९४ सामने आहेत. धोनीने पंजाबविरूद्ध रविवारी झालेल्या सामन्यात रैनाला मागे टाकलं. तो धोनीचा १९५ सामना होता.