IPL 2023, Rohit Sharma Six Video Viral : दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांचा सामना दिल्लीत रंगला आहे. दिल्लीने मुंबई इंडियन्सपुढे विजयासाठी १७२ धावांचं टार्गेट ठेवलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या गोलंदाजांचा मुंबईच्या फलंदाजांनी समाचार घेतला. रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी केली. ललीत यादव, एनरिख नॉर्जे आणि मुकेश कुमार या तिघांचीही बॉलिंग फोडत तिघांच्या ओव्हर्समध्ये सिक्स ठोकल्या. यातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एनरिख नॉर्जेच्या चेंडूंवर उत्तुंग षटकार

रोहित शर्माने एनरिख नॉर्जेच्या १४७ किमी प्रति तास वेगाने आलेल्या चेंडूवर खणखणीत सिक्सर लगावला. रोहित शर्माचं टायमिंग आणि हा सिक्सर इतका परफेक्ट जुळून आला की या सिक्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रोहितने एनरिखच्या चेंडूवर मारलेला हा षटकार व्हायरल तर होतोच आहे शिवाय त्यांचं कौतुकही होतं आहे.

रोहित शर्मा स्पेशल या नावाने व्हिडीओ व्हायरल

रोहित शर्मा स्पेशल असं नाव देत हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी ७१ धावांची भागिदारी केली. इशान ३१ धावांवर बाद झाला. पण रोहित शर्माने त्याच्या खास स्टाईलने खेळत धावफलक हलता ठेवला. रोहितने तीन षटकार आणि चार चौकार लगावले आहेत.

मुंबई इंडियन्सच्या भेदक गोलंदाजी समोर दिल्लीच्या फलंदाजांना २० ओव्हर्सही पूर्ण करता आल्या नाहीत. पीयुष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ या दोघांनी दिल्लीच्या सहा फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर रिले मेरेडिथनेही दिल्लीचे दोन गडी बाद केले. अशात आता रोहित शर्माने मारलेला सिक्स रोहित शर्मा स्पेशल म्हणून व्हायरल होतो आहे.