मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२५ च्या उंबरठ्यावर उभा आहे. मुंबई इंडियन्स आयपीएल प्लेऑफमधील दुसरा क्वालिफायर सामना आज पंजाब किंग्सविरूद्ध खेळणार आहे. या दुसऱ्या क्वालिफायरमधील विजेता संघ अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरूद्ध खेळणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी रोहित शर्माचा एक भन्नाट व्हीडिओ समोर आला आहे.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सने ५ विजेतेपद पटकावली आहेत. मुंबई इंडियन्सला क्वालिफायर-२ मध्ये आणण्यात रोहित शर्माने देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरूद्ध ८१ धावांची खेळी खेळत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला. सामनावीर ठरलेल्या रोहितने ४५ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह ही मॅचविनिंग खेळी केली होती.

मुंबई इंडियन्स लीग स्टेजचे सामने सुरू होते तेव्हा काही छोट्या चाहत्यांना भेटण्यासाठी गेले होते. यादरम्यान रोहित शर्मा फलंदाजी करत होता आणि काही लहान मुलांनी त्याला गोलंदाजी केली होती. यादरम्यानचा एक व्हीडिओ समोर आला आहे. या व्हीडिओमध्ये रोहित शर्माला चार बाजूंनी लहान मुलांनी घेरलं आहे. त्यापैकी एकाच्या हातात चेंडू आहे.

हातात चेंडू असलेला चाहता रोहितला विचारतो, “सर तुम्हाला आऊट कसं करायचं?” रोहित शर्मा क्षणाचाही विलंब न लावता त्याला उत्तर देताना म्हणतो, “नाही ते अशक्य आहे.” रोहितचं उत्तर ऐकून बाजूची मुलं हसू लागतात. रोहित शर्माचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत.

रोहित शर्मासाठी आयपीएल २०२५ ची सुरूवात चांगली झाली नसली तरी मोक्याच्या क्षणी संघासाठी मोठ्या खेळी केल्या आहेत. आयपीएल २०२५ मध्ये रोहितने मुंबई इंडियन्ससाठी १४ सामने खेळताना सुमारे ३१ च्या सरासरीने आणि १५० च्या स्ट्राईक रेटने ४१० धावा केल्या आहेत. यादरम्यान हिटमॅनने ४ अर्धशतकी खेळीही खेळल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो विराट कोहलीनंतर दुसरा खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये २७१ सामन्यांमध्ये ७,०३८ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये २ शतकं आणि ४७ अर्धशतकं आहेत. याशिवाय सर्वाधिक षटकारांच्या यादीत रोहित शर्मा सर्वाधिक षटकार लगावणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे. तर आयपीएल स्पर्धेत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या स्थानी ख्रिस गेल आहे.