Jofra Archer is unlikely to play in the match against csk: मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२३ मधील पहिला सामना गमावला आहे. आता संघाला त्यांचा दुसरा सामना त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळायचा आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सवर सामना जिंकण्याचे दडपण असेल, मात्र त्याआधीच संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आज म्हणजेच शनिवार ८ एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यासाठी संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर खेळणे साशंक आहे.

माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथ यानी त्याच्या यूट्यूब चॅनलवर माहिती दिली आहे की, शुक्रवारी नेट सत्रादरम्यान जोफ्रा आर्चरच्या कोपरला चेंडू लागला होता. अशा स्थितीत आयपीएल २०२३ मधील त्याच्या दुसऱ्या सामन्यात खेळण्याबाबत त्याला शंका आहे. जर आर्चर या सामन्यातून बाहेर पडला, तर तो संघासाठी मोठा धक्का मानला जाईल, कारण त्याच्याशिवाय इतका अनुभव असलेला दुसरा गोलंदाज नाही.

जसप्रीत बुमराह आयपीएलच्या १६ व्या हंगामाचा भाग नसल्यामुळे मुंबई इंडियन्स आधीच बॅकफूटवर आहे. त्याचा बदली खेळाडू सापडला आहे, पण दुसरा कोणताही गोलंदाज बुमराहची कसर भरुन काढू शकत नाही. अशा परिस्थितीत आर्चरही बाहेर गेला, तर मुंबई पूर्णपणे बॅकफूटवर येईल. संघाकडे फलंदाजीचे भरपूर पर्याय आहेत, पण गोलंदाजीत संघाचा हात यंदाही कमजोर असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा – IPL 2023: मुंबईत चेन्नई सुपर किंग्जचे जंगी स्वागत! महाराष्ट्राच्या आदरातिथ्याने भारावला धोनी, फ्रँचायझीने शेअर केला खास VIDEO

हिटमॅन रोहित शर्मा आयपीएलच्या १६व्या हंगामाममध्ये फलंदाज आणि कर्णधार म्हणून सुधारण्यास उत्सुक आहे. मुंबईला पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. वानखेडे स्टेडियमवर चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विजयी ट्रॅकवर परतण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. मात्र, घरच्या प्रेक्षकांसमोर संघावर अतिरिक्त दबाव असेल. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई विरुद्ध चेन्नई आकडेवारी –

आकडेवारीबद्दल बोलायचे झाले, तर दोन्ही संघ आतापर्यंत एकूण ३४ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी २० सामने मुंबईने तर १४ सामने चेन्नईने जिंकले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील वानखेडेवर दोन्ही संघ १० वेळा भिडले आहेत. सात सामने मुंबईने तर तीन सामने चेन्नईने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील गेल्या पाच सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबईने तीन आणि सीएसकेने दोन जिंकले आहेत.