रावळपिंडी एक्स्प्रेस अशी ओळख असलेला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचे भारतातही मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. मात्र, एक घटना अशीही आहे जेव्हा त्याला मुंबईकरांच्या रागाचा सामना करावा लागला होता. आयपीएलच्या २००८ मधील हंगामात केकेआर संघाकडून खेळताना शोएबने पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरला बाद केलं. यानंतर जे झालं ते शोएब अख्तरच्या आजही आठवणीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मुंबई विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच षटकात मुंबईचा स्टार खेळाडू सचिनला बाद केलं. यानंतर मुंबईच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये आलेल्या मुंबई संघाच्या चाहत्यांनी शोएब अख्तरवरच आपला राग व्यक्त करायला सुरुवात केली. त्यावेळी तत्कालीन केकेआर संघाचा कर्णधार सौरव गांगुलीला परिस्थिती हाताळण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला.

स्पोर्ट्सकिडाशी बोलताना शोएबने सांगितलं की, सचिनला बाद केल्यानंतर मुंबई संघाच्या चाहत्यांचा संताप पाहून सौरव गांगुलीला क्षेत्ररक्षणात बदल करावे लागले.

शोएब म्हणाला, “ते फारच सुंदर स्टेडियम होतं आणि वातावरणही अप्रतिम होतं. स्टेडियम खचाखच भरलं होतं, पण मी पहिल्याच षटकात सचिन तेंडूलकरला बाद केलं आणि ती माझी मोठी चूक ठरली. त्यानंतर मी जेव्हा फाईन लेगला क्षेत्ररक्षणाला गेलो तेव्हा मला मुंबईच्या चाहत्यांचा संताप सहन करावा लागला. तेव्हा सौरव गांगुलीने मला मीड लेगला बोलावलं. तसेच ते लोक तुला मारून टाकतील. मुंबईत येऊन सचिनला बाद करायला कोणी सांगितलं.”

हेही वाचा : ‘वडापाव’च्या वक्तव्यावर विरेंद्र सेहवाग म्हणाला, ” रोहितच्या चाहत्यांनी थंड घ्यावं, तुमच्यापेक्षा…”

शोएबने सांगितलं, “मी मुंबईत भरपूर काम केलं आणि खूप प्रेम मिळालं. मी वानखेडेवर आनंदी होतो कारण कोणीही माझ्या देशाला वाईट म्हटलं नाही. कोणीही वर्णभेद करणारं वक्तव्य केलं नाही. वानखेडेवरील गर्दी खूप उत्साहाने भरलेली असते. मला तेथे आणखी खेळता यायला हवं होतं अशी इच्छा आहे.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoaib akhtar share his hilarious memory on wankhede stadium in mumbai about sachin tendulkar in ipl 2008 pbs
First published on: 08-04-2022 at 00:48 IST