Shubman Gill and Pat Cummins Playing Rock Paper Scissor Video: आयपीएल २०२४ मधील ६६ वा सामना गुरुवारी (१६ मे) सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार होता. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याला पावसाने आधीपासूनच हजेरी लावली होती. परिणामी पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे हैदराबाद-गुजरातमधील सामना रद्द झाला. दरम्यान सामना पाहण्यासाठी आलेले चाहते शेवटपर्यंत सामना सुरू होईल या आशेने वाट पाहत होते. तर दुसरीकडे, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यांचा मैदानाची पाहणी करण्यासाठी गेला असतानाचा एक व्हीडिओ समोर आला आहे, ज्यात सामना कोण जिंकलं हे ठरवण्यासाठी दोघे रॉक, पेपर, सीझर खेळताना दिसत होते.

पंचांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांना मैदानावर बोलावलं तेव्हा ही घटना घडली. मैदान कव्हर्सने झाकलं होतं, तिथेच पंच गिल आणि कमिन्स उभे होते, पंच दोन्ही संघांच्या कर्णधारांना सांगत होते की पावसामुळे बराच वेळ जात असल्याने सामना होणार नाही आणि सामना रद्द करावा लागेल. क्रिकेट चाहत्यांसाठी ही एक वाईट बातमी होती, पण यादरम्यान शुभमन गिलला भन्नाट कल्पना सुचली.

पंचांनी सामना रद्द झाल्याचे सांगताच गिल त्यांना म्हणाला आता आपण रॉक पेपर सिझर खेळूया. त्याची प्रतिक्रिया पाहून आणि बोलणं ऐकून पंचही हसायला लागले. हे ऐकताच कमिन्सनेही लगेच हा गेम खेळण्याची अॅक्शन करत दोघेही खेळताना दिसले. शुभमन गिल तर आनंदाने उड्या मारताना दिसला. मात्र, हा सामना रद्द झाला आणि गुजरात टायटन्सचा हंगामातील प्रवासही त्या सामन्यासह संपला. गुजरातचा घरच्या मैदानावरील केकेआरविरूद्धचा अखेरचा सामनाही पावसामुळे रद्द झाला आणि संघ आयपीएल २०२४ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने १३ सामन्यांत १५ गुण मिळवून प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. गुजरातविरूद्धचा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. यासह १५ गुण मिळवत हैदराबादचा संघ आयपीएल २०२४ च्या प्लेऑफसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला आहे. आता त्यांची नजर पंजाब किंग्जला पराभूत करून टॉप-२ मध्ये आपले स्थान पक्के करण्यावर असेल. जर संघाने पुढील सामना जिंकला तर ते केकेआरसोबत पहिला क्वालिफायर सामना खेळतील. म्हणजेच त्यांना अंतिम फेरी गाठण्याच्या दोन संधी असतील. आता प्लेऑफमधील चौथ्या स्थानासाठी आरसीबी आणि सीएसके यांच्यात मोठा सामना उद्या म्हणजेच १८ मे रोजी होणार आहे.