Shubman Gill Heated Exchange with Umpires: आयपीएलचा ५१ वा सामना गुजरात टायटन्स आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्या दरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. सनराइजर्ससाठी हा करो या मरोचा मुकाबला होता. या सामन्यात गुजरातच्या संघाचा कर्णधार शुबमन गिल आणि पंचामध्ये जोरदार वाद झाल्याचे दिसले. पहिल्या इनिंगमध्ये शुबमन गिल रनाआऊट झाल्यानंतर तिसऱ्या पंचानी दिलेल्या निर्णयावर गिलने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये एलबीडब्लूच्या निर्णयावरून मैदानातील पंचाशी वाद घातला. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत.

पहिला वाद

गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना खेळाची वेगात सुरुवात केली. पहिल्या सहा षटकात पॉवर प्ले दरम्यान कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी ८२ धावांचा डोंगर उभा केला होता. १३ व्या षटकात जौस बटलरने मारलेल्या फटक्यावर धाव काढत असताना शुबमन गिल रनआऊट झाला. हर्षल पटेलने केलेल्या अचूक थ्रो नंतर विकेटकिपर हेनरिक क्लासेनने हाताने चेंडूला दिशा दिली आणि चेंडू स्टम्पला लागून बाजूला गेला. मात्र बेल्स उडाल्यामुळे शुबमन गिलला तिसऱ्या पंचाने बाद ठरवले.

मात्र रिप्लेमध्ये पाहताना रनआऊटबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. चेंडूने बेल्स पडल्या की क्लासेनच्या हाताने याबद्दल स्पष्टता नसल्याचे दिसत असल्याचा मुद्दा शुबमन गिलने उपस्थित केला. बाद झाल्यानंतर मैदानाबाहेर उभ्या असलेल्या पंचाशीही त्याने यावरून वाद घातला.

दुसरा वाद

गुजरात टायटन्सने हैदराबादसमोर २२५ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना हैदराबादला अवघ्या १८६ धावा करता आल्या. हैदराबादकडून सलामीला फलंदाजी करताना हेड आणि अभिषेक शर्माने ४९ धावांची भागीदारी केली. हेड २० धावा करत तंबूत परतला. त्यानंतर ईशान किशन १७ चेंडूत १३ धावांची खेळी करत माघारी परतला. या डावात अभिषेक शर्माने सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली.

१४ व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाचा एक फुलटॉस चेंडू अभिषेक शर्माच्या पायावर लागला. प्रसिद्ध कृष्णाने अपील केले असता पंचानी नाबाद असल्याचे सांगितले. यानंतर गुजरात टायटन्सने डीआरएसच्या माध्यमातून तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. बॉल ट्रॅकिंग तपासले असता चेंडू स्टम्पला जाऊन आदळत असल्याचे स्पष्ट दिसले. मात्र इम्पॅक्ट स्टम्पबाहेर असल्यामुळे अम्पायर्स कॉल देण्यात आला. या निर्णयावर शुबमन गिलने नाराजी व्यक्त करत ऑनफिल्ड पंचाशी वाद घातला. हा वाद इतका वाढला होता की, अभिषेक शर्माने मध्यस्थी करत गिलला शांत केले.

वादाबाबत शुबमन गिल काय म्हणाला?

सामन्यानंतर बोलत असताना शुबमन गिलने पंचाशी झालेल्या वादावर भाष्य केले. तो म्हणाला, “सामन्या दरम्यान पंचाशी माझा थोडा वाद झाला. पण मैदानावर तुम्ही १०० टक्के झोकून देऊन खेळत असताना त्यात अनेक भावना एकत्रित झालेल्या असतात. त्यामुळे कधी कधी भावनांचा उद्रेकही होतो.” याशिवाय संघाने केलेल्या प्रदर्शनावरही गिलने समाधान व्यक्त केले. आम्ही डॉट बॉल कमी खेळण्याचे नियोजन वैगरे काही केले नव्हते. पूर्वीसारखेच आम्ही खेळत राहिलो. काळ्या मातीची खेळपट्टी असल्यामुळे त्यावर मोठे फटके लावणे कठीण होईल, हे आम्हाला माहीत होते, त्यामुळे आम्ही सिंगल, डबल धावा घेत राहिलो.