RR vs MI, Suryakumar Yadav Shot Video: मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आपल्या चौफेर फटकेबाजीसाठी ओळखला जातो. मैदानाच्या चारही बाजूंना शॉट मारणं ही त्याची फलंदाजीची खासियत आहे. दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातही सूर्याने असा काही शॉट मारला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी मिळून सावध सुरूवात करून दिली. सुरूवातीला फलंदाजी करणं कठीण होतं. त्यामुळे मुंबईच्या सलामी जोडीने सावध सुरूवात करत मोठे फटके खेळणं टाळलं. सलामीला फलंदाजी करताना रोहित आणि रिकल्टनच्या जोडीने मिळून ११६ धावा जोडल्या.

मुंबई इंडियन्सला जी सुरूवात हवी होती ती रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी करून दिली. त्यानंतर उरलेलं काम सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी मिळून केलं. शेवटी या दोघांनी गोलंदाजांचा समाचार घेत ९४ धावांची भागीदारी केली. या सामन्यातही सूर्याने फाईन लेगच्या दिशेने हटके शॉट मारला.

सूर्यकुमार यादव आपल्या सुपला शॉटसाठी प्रसिद्ध आहे. सूर्याने जोफ्रा आर्चरच्या वेगवान चेंडूंवर लोटांगण घालून फटके मारले. यादरम्यान त्याने एक आगळा वेगळा फटका मारला. गोलंदाजाने टाकलेला फुलटॉस चेंडू त्याने फाईन लेगच्या दिशेने मारला. मात्र, हा शॉट मारल्यानंतर तो मैदानावरच झोपला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सूर्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

या सामन्यात फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने ३० चेंडूंचा सामना करत नाबाद ४८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ३ षटकार खेचले. यासह त्याने ऑरेंज कॅप देखील पटकावली आहे. सूर्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. त्याने सर्वाधिक वेळेस सलग २५ पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान गाठलं आहे. त्याने सलग ११ वेळेस असा कारनामा करून दाखवला आहे.

या सामन्यात मुंबईने राजस्थानसमोर विजयासाठी २१८ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पहिल्या डावात मुंबईच्या फलंदाजांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. तर धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. मुंबईने हा सामना १०० धावांनी आपल्या नावावर केला.